ठाणे: सलग तीन वेळा महापौर पद भूषवत हॅटट्रिक साधण्याची किमया, विधान परिषदेवर सहा वर्षांसाठी आमदारकी, शिवसेनेचे उपनेते पद अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे अनंत तरे एकदा प्रचंड नाराज झाले होते. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे आदेश शिरसावंद्य मानणाऱ्या अनंत तरे यांनी शिवसेनेविरोधात बंड केले होते. (shivsena leader anant tare ego clash with uddhav thackeray in 2014)
मी शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता असताना माझे तिकीट कसे कापले गेले, असा सवाल अनंत तरे यांनी उपस्थित केला होता. ठाण्यातील विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही म्हणून अनंत तरे नाराज झाले होते. त्यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय जनता पार्टीकडून (भाजपा) अनंत तरे यांना उमेदवारी मिळाली होती. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनंत तरे यांना मातोश्री बंगल्यावर बोलावून घेतले. त्यांची ठोस आश्वासन देऊन समजूत काढली. यानंतर अनंत तरे यांनी माघार घेतली. त्यांचे बंड थंड झाले.
अनंत तरे सलग तीन वेळा ठाणे शहराचे महापौर झाले. या निमित्ताने त्यांनी ठाण्याच्या महापौर पदावर काम करण्याची हॅटट्रिक केली. शिवसेनेकडून अनंतर तरे २००० ते २००६ या कालावधीत आमदार म्हणून कार्यरत होते. विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर जाधव यांचा पराभव करुन ते आमदार झाले होते. एकविरा देवस्थान ट्रस्ट, कार्ला तसेच अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी अनंत तरे यांची नियुक्ती झाली होती.
अनंत तरे २००८ पासून शिवसेनेचे उपनेते होते तसेच २०१५ पासून ते पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते. कोळी समाजातून आलेल्या अनंतर तरे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेसाठी योगदान दिले. आनंद दिघे यांच्या कार्यामुळे शिवसेनेचे ठाण्यातील महत्त्व प्रचंड वाढले. या वास्तवाचे भान ठेवून शिवसेनेचे नागरिकांच्या मनातील स्थान कायम राखण्यासाठी अनंत तरे यांनी काम केले. पण एकनाथ शिंदे यांच्यासारखा नवा आक्रमक नेता सक्रीय झाल्यानंतर हळू हळू तरेंचे ठाणे जिल्ह्यातील महत्त्व कमी झाले. मात्र अखेर पर्यंत अनंत तरे सार्वजनिक जीवनात सक्रीय होते. एकनाथ शिंदे आणि अनंत तरे यांनी एकमेकांना साथ देत शिवसेना ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वाढवण्याचे काम केले.
शिवसेना या पक्षाची सुरुवात मुंबई-ठाणे पट्ट्यात झाली. पक्ष वाढवण्यासाठी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाला शिरसावंद्य मानून मुंबई-ठाणे पट्ट्यात अविश्रांत मेहनत घेत शिवसैनिकांनी पक्ष वाढवला. या काळात अनंत तरे प्रचंड सक्रीय होते. त्यांनी जनंसप्रक वाढवत त्याचा शिवसेनेला राजकीय लाभ मिळवून दिला. पण झुंजार कामगार नेते सूर्यकांत महाडिक यांच्या पाठोपाठ दिड महिन्यांच्या आत अनंत दिघे यांचे निधन झाले. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या निधनाने शिवसेनेच्या युवा पिढीने मोठा अनुभव गमावला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. कोळी समाजातून आलेल्या अनंत तरे यांनी मुंबई-ठाणे पट्ट्यातील कोळी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष योगदान दिले, असे जाणत्या शिवसैनिकांनी सांगितले.
अनंत तरे यांच्या निधनाने शिवसेना कुटुंबातील एक तारा निखळला, कोविड योद्धा अखेर कोविडने आपल्यातून हिरावून नेला. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अनंत तरे यांना श्रद्धांजली वाहिली. अनंत तरे म्हणजे ठाण्यातला सच्चा कार्यकर्ता. शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी द्यायची आणि अनंत तरे यांनी ती निभावायची आणि त्यांना सर्व कोळी समाजातील बांधवांनी, शिवसैनिकांनी साथ द्यायची हे जणू ठरलेले समीकरणच, असेही मुख्यमंत्री म्हणाले.