Six Years Old Boy Drowned In A Pit Dug For An Elevator In Dombivali : डोंबिवलीच्या सागर्ली गावातील विघ्नहर्ता इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या वेदांत जाधव या सहा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विघ्नहर्ता इमारतीजवळ एका अनधिकृत इमारतीत लिफ्टसाठी खड्डा खणला होता. खेळताना या खड्ड्यात पडून वेदांतचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी (पोस्टमॉर्टेम) वेदांतचे पार्थिव शास्त्रीनगर रुग्णालय येथे नेण्यात आले.
वेदांत वडील आणि आजी-आजोबा यांच्यासोबत राहात होता. तो अनधिकृत इमारतीच्या परिसरात खेळण्याच्या निमित्ताने अनेकदा जायचा. नेहमीच्या सवयीप्रमाणे मंगळवार ५ जुलै २०२२ रोजी वेदांत एकटाच बॉल सोबत खेळत अनधिकृत इमारतीच्या परिसरात गेला. पण बराचवेळ झाला तरी परतला नाही. घरच्यांनी वेदांतला शोधण्यास सुरुवात केली. जवळच्या इमारतीच्या परिसरात जातो म्हणून तिथे शोध सुरू केला त्यावेळी खड्ड्यात वेदांत आढळला. खड्ड्यातून वेदांतला बाहेर काढण्यात आले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. खड्ड्यात पडलेला बॉल काढण्याच्या प्रयत्नात वेदांतचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याआधी लिफ्टच्या खड्ड्यात पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीतील सागाव येथे घडली होती. आता खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू होण्याची घटना डोंबिवलीच्या सागर्ली गावात घडली. ज्या इमारतीमधील लिफ्टच्या खड्ड्यात पडून वेदांतचा मृत्यू झाला त्या इमारतीचे बांधकाम २०१२ पासून सुरू आहे. या प्रकरणात संबंधित इमारतीचे काम करणाऱ्यांवर पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचा ठपका ठेवून कारवाई होणार की नाही हे अद्याप समजलेले नाही.
साधारणपणे इमारतीत खणलेल्या खड्ड्यांच्या आसपास काम करणाऱ्यांव्यतिरिरिक्त इतर कोणी फिरकू नये यासाठी पत्रे लावणे, सुरक्षा दोऱ्या बांधणे, सूचना फलक लावणे, खड्ड्यांच्या जवळ काळोख पडताच लाल दिवे लावणे असे उपाय केले जातात. काही ठिकाणी संबंधित भूखंडावर सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली जाते. ज्या खड्ड्यात वेदांत पडला त्या ठिकाणी या प्रकारची काळजी घेतलेली नव्हती असे स्थानिकांचे म्हणणे आहे.