घोडबंदर रोडवर एकाच दिवसात तीन अपघात, ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Three accidents on Ghodbunder road Thane ठाण्यातील घोडबंदर रोड येथे काल (शुक्रवार, ५ मार्च २०२१) एकाच दिवसात तीन अपघात झाले. यातील एका अपघातामध्ये पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

Three accidents on Ghodbunder road Thane
घोडबंदर रोडवर एकाच दिवसात तीन अपघात, ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • घोडबंदर रोडवर एकाच दिवसात तीन अपघात, ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
  • अपघातांची पोलीस चौकशी सुरू
  • एका अपघातात ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू आणि आईवडील जखमी

ठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोड येथे काल (शुक्रवार, ५ मार्च २०२१) एकाच दिवसात तीन अपघात झाले. यातील एका अपघातामध्ये पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. (Three accidents on Ghodbunder road Thane)

घोडबंदर रोड येथील गायमुख परिसरात पहिला अपघात झाला. खाण्याचे तेल घेऊन जात असलेला टँकर उलटला. दुसरा अपघात विहंग इन सिग्नल जंक्शन येथे झाला. पर्यटकांना घेऊन जात असलेले वाहन मेट्रोच्या बॅरिकेडला धडकून उलटले. तिसरा अपघात घोडबंदर रोडवरील ब्रम्हांड सिग्नल येथे झाला. एक बाइक (दुचाकी) आणि ठाणे मनपाचा पाण्याचा टँकर यांची टक्कर झाली. 

बाइक रस्त्यावरुन घसरल्यामुळे ठाणे मनपाच्या पाण्याच्या टँकरला धडकली. बाइकवर आईवडिलांसह पाच वर्षांचा मुलगा बसली होती. अपघातात मुलाचा मृत्यू झाला. मृत मुलाचे नाव आरुष जाधव असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातामध्ये आरुषचे वडील राजेश जाधव (३३) आणि आई दर्शना जाधव (२९) जखमी झाले. घोडबंदर रोडवरील तिन्ही अपघातांप्रकरणी पोलिसांनी आवश्यक त्या नोंदी करुन घेतल्या आहेत. अपघात प्रकरणांची चौकशी सुरू आहे. 

घोडबंदर रोड हा ठाणे जिल्ह्यातील एक प्रमुख वर्दळीचा रस्ता आहे. हा सुमारे २० किमी लांबीचा मार्ग मुंबई महानगर क्षेत्रातील एक प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याची राज्य महामार्ग ४२ अशीही एक ओळख आहे. ठाणे शहरातील कापूरबावडी जंक्शन येथून घोडबंदर रस्त्याची सुरुवात होते. हा रस्ता पुढे दोन दिशांना जातो. घोडबंदर रोड एकीकडे पूर्व द्रुतगती महामार्गाला (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३) तर दुसरीकडे पश्चिम द्रुतगती महामार्गाला (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८) जाऊन मिळतो. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून मुंबईत जाण्यासाठी तसेच महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे.

घोडबंदर रोड येथे कायम दुचाकी, कार, मालवाहक वाहने, पर्यटकांना घेऊन जाणारी वाहने तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा या अंतर्गत येणाऱ्या बस यांची प्रचंड वर्दळ असते. एवढ्या वर्दळीच्या घोडबंदर रोड येथे एकाच दिवशी तीन अपघात झाल्यामुळे ठाणेकरांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण आहे.

मेट्रोची कामं, रस्त्याची कामं यांमुळे घोडबंदर रोड येथे अधूनमधून ठिकठिकाणी खोदकाम सुरू असते. अनेककदा बॅरिकेड लावून रस्त्याच्या काही भागांतून वाहनांना जाण्यासाठी मनाई केली जाते. मात्र वहतुकीच्या नियमानुसार रस्त्यावर काम सुरू असताना संबंधित यंत्रणा धोक्याचा इशारा फलक आणि खाणाखुणा सहज दिसतील, अशा पद्धतीने प्रदर्शित करतात. रस्त्यावर आवश्यक तिथे धोक्याचा इशारा देणारे तसेच गतीरोधक, वळण, वाहने सावकाश चालवा अशा स्वरुपाचा संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत. पण नागरिकांनी फलक वाचला नाही अथवा वाचूनही नियमांचे उल्लंघन केले तर अपघात टाळणे कठीण आहे. शुक्रवारी झालेल्या अपघातांमध्ये नेमकी कोणाकडून चूक झाली याची तपासणी सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. प्रचंड वर्दळीच्या घोडबंदर रोड येथे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी