Ulhasnagar Crime : उल्हासहनगर : उल्हासहनगरमध्ये घरफोडी करणार्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. चोरी करताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते, पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने अवघ्या दोन तासांत गुन्ह्याचा छडा लावला आणि आरोपींना जेरबंद केले.
उल्हासनगर वीर तानाजी नगर परिसरात संजय लबाना यांचे घर आहे. लांबा १२ तारखेला पंजाब येथील अमृतसरमध्ये देवदर्शनासाठी गेले होते. याचाच फायदा घेऊन चोरांनी रात्रीच्या सुमारास घराचे कुलुप तोडून प्रवेश केला आणि घरातील सोनं,चांदी दोन सिलेंडर आणि रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. या घटनेची माहिती हिललाईन पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरूवात केली. सीसीटीव्हीत दिसणारा सराईत आरोपी राजा उर्फ विरुमल आहुजा याला सुरूवातीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने त्याचे दोन साथीदार बबन उर्फ जमनादास वनीदानी आणि कमला सिंग मोहनसिंग लबाना यांच्या साहाय्याने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक करून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार राजा उर्फ विरुमल आहुजा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यात ३० हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.