किल्ले रायगड: राष्ट्रपती रामनाथ कोविंद मंगळवार ७ डिसेंबर २०२१ रोजी स्वराज्याची राजधानी रायगडला भेट देणार आहेत. ते 'रोप-वे'ने रायगड किल्ल्यावर येणार आहेत. राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारुन राष्ट्रपती येत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रायगड किल्ल्यावर आहे. किल्ल्यावर हेलिकॉप्टर उतरवले अथवा तिथून हेलिकॉप्टरद्वारे उड्डाण केले तर मोठ्या प्रमाणावर धूळ माती केर कचरा उडतो. ही धूळ माती उडून माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने जाते. यातून शिवाजी महाराजांचा अवमान होतो, अशी भूमिका घेत १९९६ मध्ये शिवाजी महाराजप्रेमींनी किल्ल्यावरील हेलिपॅडला विरोध केला. अखेर १९९६ मध्येच किल्ल्यावरील हेलिपॅड हटविण्यात आले. यामुळे राष्ट्रपती 'रोप-वे'ने रायगड किल्ल्यावर येणार आहेत.
याआधी राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर थेट किल्ल्यावर उतविण्यासाठी होळीच्या माळावर नव्याने तात्पुरते हेलिपॅड उभारण्याचा विचार सुरू होता. मात्र विरोधाचा विचार करुन अखेर 'रोप-वे'द्वारे राष्ट्रपतींनी यावे, असा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला. राष्ट्रपती कार्यालयाने शिवाजी महाराजप्रेमींच्या भावनांचा विचार करुन 'रोप-वे'द्वारे राष्ट्रपती किल्ले रायगड येथे येतील, असे कळवले आहे.
राष्ट्रपतींचा दौरा असल्यामुळे ३ डिसेंबर पासून ७ डिसेंबर रोजी राष्ट्रपती दौरा आटपून परत जाईपर्यंत रायगड किल्ला आणि किल्ल्यावर जाण्यायेण्याचा 'रोप-वे' पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय झाला आहे. सुरक्षेसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने ही माहिती दिली.