विरार: पालघर जिल्ह्यातील विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथे आयसीआयसीआय बँकेची शाखा (ब्रँच) आहे. या शाखेवर गुरुवार २९ जुलै २०२१ रोजी बँक बंद झाल्यानंतर रात्री आठच्या सुमारास दरोडा पडला. या घटनेत बँक मॅनेजर योगिता वर्तक (३४) यांचा मृत्यू झाला. कॅशियर श्वेता देवरूख (३२) गंभीर जखमी झाल्या. Virar: Lady manager killed, cashier injured as two men barge into ICICI bank to loot cash and gold, one arrested
बँक बंद झाली होती. दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर कॅश मोजून लॉक करुन ठेवण्याचे काम सुरू होते. बँकेत फक्त मॅनेजर आणि कॅशियर एवढेच उपस्थित होते. इतर मंडळी घरी गेली होती. याचवेळी बँकेचा माजी मॅनेजर अनिल दुबे याने एका अज्ञात व्यक्तीसह शाखेत प्रवेश केला. दुबेने चाकुचा धाक दाखवत बँकेतील रोख रक्कम आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. या वेळी बँक मॅनेजर योगिता वर्तक आणि कॅशियर श्वेता देवरूख विरोध सुरू केला. दोघींनी मदतीसाठी आरडाओरडा केला. विरोध होत असल्याचे पाहून दुबेने चाकूचे वार केले. यात बँक मॅनेजर योगिता वर्तक यांचा मृत्यू झाला आणि कॅशियर श्वेता देवरूख गंभीर जखमी झाल्या.
आवाज ऐकून स्थानिकांनी पोलिसांना कळवले. विरार पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या श्वेता देवरूख यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर सोने आणि पैशाची बॅग घेऊन पळून जात असलेल्या दुबेला स्थानिकांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. दुबेची चौकशी सुरू आहे. पळून गेलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. तब्येत स्थिरावल्यानंतर कॅशियर श्वेता देवरूख यांचे स्टेटमेंट नोंदवले जाईल. परिसरातील आणि बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज बघून पोलीस आणखी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.