ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. पक्षाचे बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आणखी एक झटका दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यातील शिवसेनेच्या ६७ पैकी 66 नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्याने हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटात सहभागी न झालेली ठाण्यातील एकमेव नगरसेविका कोण? याची चर्चा कालपासून रंगत आहे. (Who is the only corporator who did not participate in Eknath Shinde group ?, Support of 66 corporators from Thane)
अधिक वाचा : शिंदे सरकार येताच प्रताप सरनाईकांना लॉटरी, नागला बंदर खाडी किनारा प्रकल्पाला 150 कोटींची मंजुरी
ठाणे महापालिकेत गेल्या काही दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आणि अपक्ष १० आमदारांनी बंड पुकारुन महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री पदावर बसून उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. दरम्यान, शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच असा दावा करण्यात येत आहे. तसेच 18 पैकी 12 खासदार लवकरच एकनाथ शिंदे गटात सामील होतील, असा दावा शिवसेनेच्या एका बंडखोर आमदाराने केला आहे.
काल ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पण एका नगरसेविकेने शिंदे गटापासून सध्या चार हात लांब राहणे पसंत केले आहे. नंदिनी विचारे असे.या नगरसेविकेचे नाव आहे. त्या ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी आहेत. काल खा. भावना गवळी यांच्या जागी शिवसेनेच्यावतीने लोकसभेत चीफ व्हीप म्हणून राजन विचारे यांना बढती देण्यात आली आहे.
अधिक वाचा :सोमय्यांकडून मुख्यमंत्र्यांची भेट; शिंदे गटातील यामिनी जाधव, सरनाईकांवरील ईडीची पीडा टळणार?
राज्यात गेली काही दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू असताना ठाण्याचे खासदार राजन विचारे मातोश्रीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने शहरांच्या नामकरणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे समर्थन केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच ते अमरनाथ यात्रेला गेले. यात्रेहून परतल्यानंतर विचारे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यांच्यावर ठाण्याची जबाबदारी दिल्याचेही बोलले जात होते.