मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी अत्यंत मोठं बंड करुन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची राज्यातील सत्ता अनपेक्षितपणे घालवली. यानंतर भाजपच्या (BJP) मदतीने त्यांनी सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री पदाची माळही गळ्यात पाडून घेतली. या सगळ्या घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला मतदारसंघ आणि बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात (Thane) गेले होते. जिथे त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. मात्र, यावेळचा एक खास व्हीडिओ आता समोर आला असून सध्या तो प्रचंड व्हायरल होत आहे.
एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड आणि त्यानंतर सत्तास्थापनेचा सगळा डाव यामध्ये साधारण पंधरा दिवसांचा कालावधी गेला. जो एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयासाठी खूप कठीण होता. मात्र, एकनाथ शिंदेच्या शपथविधीनंतर हा ताण प्रचंड हलका झाला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा ठाण्यात आपल्या घरी आले तेव्हा त्यांच्या पत्नी लता शिंदे (CM Eknath Shinde Wife Lata Shinde) यांनी त्यांचं खास आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने स्वागत केलं.
एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी ठाण्यातील त्यांच्या घराबाहेर खास बँड पथक बोलावण्यात आलं होतं. याच बँड पथकात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे या सामील झाल्याचं पाहायला मिळालं. लता शिंदे या अतिशय सराईतपणे बँड वाजवत असल्याचं यावेळी दिसून आलं. त्यामुळे सारेच उपस्थित अवाक् झाल्याचं दिसून आलं.
दरम्यान, लता शिंदे यांचा हा व्हीडिओ सध्या खूपच व्हायरल होत असून सोशल मीडियावर त्याबाबत अनेक जण व्यक्तही होत आहेत.
अधिक वाचा: उद्धव ठाकरेंच्या हातातून धनुष्यबाणही जाणार; तर गुलाबराव म्हणतात, खरी शिवसेना आमचीच
शिंदे सरकारच्या पाठिशी १६४ आमदारांचं पाठबळ
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणी पार पडली. या बहुमत चाचणीत शिंदे-फडणवीस सरकारने एकूण १६४ मते मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला. १४४ हा बहुमताचा आकडा असून त्यापेक्षा २० अधिकची मतं शिंदे सरकारला मिळाली. तर मविआला फक्त ९९ मतांवर समाधान मानावं लागलं.
लवकरच नवं मंत्रिमंडळ येणार अस्तित्वात
सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता लवकरच नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की, 'त्यांच्या गटाच्या आणि भाजपच्या खाते वाटपाबाबत चर्चा करण्यापूर्वी आपल्याला थोडा वेळ हवा आहे. मी आणि फडणवीस बसून मंत्रिमंडळ आणि खात्यांच्या वाटपावर चर्चा करू. आम्ही भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशीही बोलू.' असं शिंदे म्हणाले होते.
मात्र, आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना खूपच वेग आला असून येत्या आठवड्याभरात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.