Bhiwadi Building Collapse: भिवंडीत ८ वर्ष जुनी इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू 

ठाणे
Pooja Vichare
Updated Aug 24, 2019 | 10:31 IST

Bhiwadi Building Collapse: भिवंडीत चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. यात आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 Bhiwadi building collapse
Bhiwadi Building Collapse: भिवंडीत ८ वर्ष जुनी इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • भिवंडीत ८ वर्ष जुनी इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.
  • या इमारत दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • या दुर्घटनेत ५ जण गंभीर जखमी झालेत.

Bhiwadi Building Collapse: भिवंडीत ८ वर्ष जुनी इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारत दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दुर्घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ इंदिरा गांधी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शांतीनगर पिराणीपाडा या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास इमारत कोसळल्याची घटना घडली. चार मजली ही इमारत होती. 

शांतीनगर भागात असलेली पिराणीपाडामधील सिटी लाईट्स हॉटेलच्या मागे, मतलो सरदार ऑफिसजवळ ही इमारत होती. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्नीशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत चार ते पाच जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं आहे तर अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतं आहे. 

 

 

 

 

शुक्रवारी रात्रीच ११ वाजण्याच्या सुमारास या इमारतीला तडे पडण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर तात्काळ रहिवाशांनी महानगरपालिकेच्या आपतकालीन कक्षाला यासंदर्भातली माहिती देण्यात आली होती. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर आपतकालीन कक्ष, अग्निशामक दल जवानांसह शांतीनगर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. त्या इमारतीमधील कुटुंबियांना घराबाहेर काढत असतानाच मध्यरात्री दीड- दोन वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळली. 

भिंवडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अशोक रणखांब यांनी सांगितलं की, आम्हाला एक मॅसेज मिळाला आहे की इमारतीचा खांबा तुटत आहे. तात्काळ आमची आपत्कालीन टीम येथे पोहोचली आणि तपासणीनंतर त्यांना आढळले की ही इमारत कोसळणार आहे.

 

 

तसंच रणखांब पुढे म्हणाले की, इमारत धोकादायक असल्यामुळे आम्ही संपूर्ण रिकामी केली होती. पण काही लोकांनी परवानगीशिवाय इमारतीत पुन्हा प्रवेश केला. तेवढ्यात ती इमारत कोसळली. चार लोकांची सुटका करण्यात आली, त्यातल्या एकाचा मृत्यू झाला. ही ८ वर्ष जुनी इमारत आहे आणि ती बेकायदेशीरपणे बांधली गेली होती. दुर्घटनेची चौकशी केली जाईल. 

 

 

घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे. तसंच मनपा आयुक्त, तहसीलदार, पोलीस उपायुक्त घटनास्थळावर उपस्थित आहेत. या इमारत आठ वर्ष जुनी होती. तर मुन्नवर अन्सारी या बिल्डरनं ती इमारत बांधली होती. ही इमारत अनधिकृत असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.

 

 

या दुर्घटनेत २६ वर्षीय सिराज अहमद अन्सारी आणि २२ वर्षीय आखीब यांचा मृत्यू झाला आहे. अब्दुल अजीज सय्यद मुलाणी, जावेद सलीम शेख, नरेंद्र बवाणे( उपस्थानक अधिकारी), देविदास वाघ(फायरमन) यात जखमी झाल्याचं वृत्त आहे. मध्यरात्रीपासूनच इमारत रिकामी करण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे घटनास्थळी आपतकालीन कक्षातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह जवळपास दहा ते पंधरा जणांवर इमारतीचा ढिगारा कोसळला आङे. आपतकालीन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झालेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी