[VIDEO]: लघुशंका आल्याने मोटरमनने लोकल ट्रेनच थांबवली, व्हिडिओ व्हायरल

ठाणे
Updated Jul 17, 2019 | 23:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Local Train stopped to pee: लोकल ट्रेनच्या मोटरमनचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मोटरमनने लोकल थांबवल्याचं दिसत आहे मात्र, त्यामागचं कारण तांत्रिक बिघाड नाही तर...

Central Railway Motorman
लघुशंका आल्याने मोटरमनने लोकल ट्रेनच थांबवली, व्हिडिओ व्हायरल 

थोडं पण कामाचं

  • मध्य रेल्वेची लोकल अचानक थांबली कारण...
  • लोकल ट्रेन ट्रॅकवर थांबवून त्याने केलं असं काही...
  • व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

उल्हासनगर: 'रोज मरे त्याला कोण रडे' असं मध्य रेल्वेच्या बाबतीत म्हटलं जातं. बुधवारी सकाळी सुद्धा असाच प्रकार मध्य रेल्वेच्या प्रवाशांसोबत घडला. सकाळच्या सुमारास पेंटाग्राफची तार तुटल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. ऐन सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असतानाच दुसरीकडे एक मुंबईहून उल्ल्हासनगरच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन अचानक ट्रॅकवर थांबवण्यात आली. लोकल ट्रेन थांबवण्याच्या मागचं कारण म्हणजे कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता तर वेगळचं होतं. मोटरमनला लघुशंका आल्याने त्याने चक्क लोकलच थांबवली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास मध्य रेल्वेची मुंबईहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल ट्रेन अचानक थांबली. उल्ल्हासनगर आणि विठ्ठलवाडी या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर लोकल थांबली. यानंतर मोटरमनने रुळावर उतरून लघुशंका केली. कुठलाही सिग्नल किंवा तांत्रिक बिघाड नसताना लोकल ट्रेन रुळावर थांबवण्यात आली होती. याच दरम्यान एका व्यक्तीने मोटरमनला लोकल समोर उभं राहून लघुशंका करताना पाहिलं आणि त्याचा व्हिडिओ शूट केला.

मोटरमनचा हा व्हिडिओ एका झटक्यात व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत मोटरमन लोकल ट्रेनसमोर ट्रॅकवर उभा राहून लघुशंका करताना दिसत आहे. लघुशंका केल्यानंतर हा मोटरमन पुन्हा ट्रेनमध्ये जातो आणि ट्रेन सुरू करतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान या प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून प्रतिक्रिया समोर आली असून या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे.

पाऊस असो किंवा नसो मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. कधी पेंटाग्राफ तुटतो, कधी रेल्वे रुळाला तडा, कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत होते. या सर्वांचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. मात्र, आता तर मोटरमनला लघुशंका आल्याने त्याने लोकल ट्रेन ट्रॅकवर थांबवली आणि यामुळे प्रवाशांना उशीर झाला आहे.

बुधवारी सकाळी वाहतूक विस्कळीत

बुधवारी सकाळी ऐन गर्दीच्या सुमारास मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे तब्बल एक तासाहून अधिक काळ थांबवण्यात आली होती. सकाळी चाकरमान्यांची कार्यालयात जाण्यासाठी घाई असते आणि त्याच दरम्यान हा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये चांगलीच नाराजी होती. लोकल स्थानकांतील गर्दी कमी करण्यासाठी एक्सप्रेस गाड्या ठाण्यासह महत्वाच्या स्थानकांवर थांबवण्याचा निर्णय घेतला तसेच कल्याण-डोंबिवली मनपातर्फे विशेष बस सोडण्यात आल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी