Eknath Shinde group vs Thackeray Group: ठाण्यातील मनोरमानगर भागात वाचनालय ताब्यात घेण्यावरून काही दिवसांपूर्वी शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील कोपरीतील कुंभारवाडा भागातील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा आमने सामने समोर आले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करत दोन्ही गटांना शाखेची चावी देऊन वाद मिटविला. (Eknath Shinde and thackeray group supporters clash over shiv sena shakha in kopri thane watch video)
कोपरी परिसरातील कुंभारवाडा भागात शिवसेना शाखा असून हा परिसर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात येतो. या शिवसेना शाखेचे शिंदे गटाकडून नुतनीकरण करण्यात येणार आहे. परंतु ही शाखा तोडणार आहेत, अशी अफवा पसरली आणि त्यानंतर शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपनेत्या अनिता बिर्जे हे कृष्णकुमार कोळी हे समर्थकांसह शाखेत दाखल झाले. त्याचवेळेस शाखेत शिंदे गटाचे प्रकाश कोटवानी, रोहित गायकवाड, माजी नगरसेवक मालती पाटील आणि शर्मिला पिंपोळकर या उपस्थित होत्या. त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते परिसरात जमू लागले आणि शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट आमने सामने आले. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
या वादाबाबत माहिती मिळताच शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, राम रेपाळे यांच्यासह कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर शाखेत जाऊन बसले. परंतु त्याआधीच पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करत दोन्ही गटांना शाखेची चावी देऊन वाद मिटविला. काहीजण प्रसिद्धीसाठी असा प्रकार करीत असून या शाखेचे आम्ही नूतनीकरण करीत आहोत. परंतु काही जणांनी ही शाखा तोडणार असल्यामुळे हा प्रकार घडला. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी सोबत मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी नव्हे तर भगव्याशी एकनिष्ठ असणाऱ्यांनी शाखेत बसावे, अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली.