VIDEO: पालघर प्रकरणातील १०१ आरोपींची नावे गृहमंत्र्यांनी केली सार्वजनिक

कोरोनाही आपण लढत असताना पालघर प्रकरणात काहींनी जातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. हे अतिशय दुर्देवी, ही राजकारण करण्याची वेळ नाहीये, एकत्र येऊन कोरोनाशी लढम्याची वेळ आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटल

palghar incident 101 arrested accused name list shared maharashtra home minister anil deshmukh
पालघर प्रकरणातील १०१ आरोपींची नावे गृहमंत्र्यांनी केली सार्वजनिक (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • पालघर हत्याकांडातील आरोपींची नावे सार्वजनिक 
  • राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आरोपींची नावे केली सार्वजनिक 
  • पालघर हत्याकांडाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये 

मुंबई: पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेवरुन राजकारण होत असताना आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर भाष्य केलं आहे. पालघर हत्याकांड प्रकरणात कुणीही मुस्लिम आरोपी नाहीये असं स्पष्ट करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणातील १०१ आरोपींची नावे सार्वजनिक केली आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून या प्रकरणावर भाष्य केलं आहे. अनिल देशमुख यांनी म्हटलं, "पालघरची जी दुर्दैवी घटना घडली, यामध्ये तिघांची हत्या करण्यात आली ती माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. ज्या परिसरात ही घटना घडली तो आदिवासीबहुल परिसर आहे. या घटनेची चौकशी सीआयडीकडे देण्यात आला आहे. ही घटना झाल्यानंतर आठ तासांच्या आत १०१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या १०१ जणांची यादी मी सार्वजनिक करत आहे. या आरोपींमध्ये एकही मुस्लिम व्यक्ती नाही."

कोरोनाही आपण लढत असताना पालघर प्रकरणात काहींनी जातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. हे अतिशय दुर्देवी आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाहीये, एकत्र येऊन कोरोनाशी लढम्याची वेळ आहे असंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. 

पालघर प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नका- मुख्यमंत्री 

पालघर जिल्ह्यात तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापर्वीच स्पष्ट केले आहे. पालघर येथे झालेल्या हत्याकांडानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १०० हून अधिक जणांना अटक केली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी