Dombivli News: बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात डोंबिवलीची मध्यवर्ती शाखा नेमकी कोणाची यावरून अंदाजे दोन महिन्यांपूर्वी मोठया प्रमाणात वाद झाला होता. त्यानंतर या शाखेचे सामंजस्याने दोन भाग करण्यात आले. मात्र आज सकाळी पुन्हा एकदा हा वाद उफाळला असून ही शाखा आमचीच आहे असा दावा बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून करत या शाखेवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी झाली. (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray and Balasahebanchi Shiv Sena supporters clash in dombivli over shakha watch video)
विशेष म्हणजे कोरोना कालखंडाच्या आधीपासूनच या शाखेच्या जागेची विक्री कराराचे काम सुरू होते व ते आता अधिकृतपणे आमच्या नावावर झाल्याचा दावा यावेळी शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. तसेच आता ही शाखा बाळासाहेबांच्या शिवसेनेची असल्याचे सांगण्यात आले आहे. तर यावेळी शाखा ताब्यात घेतल्यानंतर ठाकरे गटातील महिला कार्यकर्त्यांनी शाखेवर मोठा गोंधळ घातला असून सध्या या शाखेवर तणावाचे वातावरण असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एकीकडे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे समर्थकांचा गोंधळ दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना गटाची कार्यकर्त्यांची शाखेवर नारेबाजी पहायला मिळाली.