पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

ठाणे
Updated May 08, 2020 | 03:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात एक मोठा निर्णय झाला. राज्य सरकारने पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरवसिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवले.

Palghar
पालघर मॉब लिंचिंग   |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर
  • आधीच ५ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन आणि ३५ अधिकाऱ्यांच्या बदल्या
  • तपास राज्याच्या क्राईम ब्रँचच्या हाती

पालघर: पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात एक मोठा निर्णय झाला. राज्य सरकारने पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरवसिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. याआधी पालघर प्रकरणाचा तपास राज्याच्या क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. दोषींवर कारवाई होईल, असे राज्य सरकार वारंवार सांगत आहे. 

५ पोलिसांचे निलंबन, ३५ जणांच्या बदल्या

मॉब लिंचिंग प्रकरणात आतापर्यंत ५ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन आणि ३५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर आता जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले गावात मॉब लिंचिंग झाले होते. ही घटना १६ एप्रिलच्या रात्री घडली होती. गुरूंचे निधन झाल्यामुळे अंत्यदर्शनासाठी २ साधू एका कारमधून तातडीने गुजरातच्या दिशेने निघाले होते. गडचिंचले गावात कार अडवण्यात आली आणि पोलिसांच्या उपस्थितीत दोन्ही साधू आणि कारच्या चालकाची हत्या करण्यात आली. नागरिकांनी लाठ्या-काठ्या आणि दगडाने हल्ला करुन सामूहिक हत्याकांड केले. या प्रकरणाचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आणि राज्य सरकारने कारवाई केल्याचे जाहीर केले. 

मॉब लिंचिंग प्रकरणात ११५ जणांना अटक

मॉब लिंचिंग प्रकरणात ११५ जणांना अटक करण्यात आली. अटकेतील सर्व आरोपींना तलासरी न्यायदंडाधिकाऱ्यांनी १४ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यापैकी ३ जण ६० पेक्षा जास्त वयाचे आणि ९ जण अल्पवयीन असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात ठेवण्यात आले. इतर आरोपींना पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये ठेवण्यात आले. चौकशी सुरू असताना एका आरोपीला कोरोना झाल्याचे कळल्यानंतर त्याला मुंबईत जे जे हॉस्पिटलमधील जेल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले.  अद्याप काही आरोपी हाती आले नसल्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. हत्याकांड विषयावर बोललो तर गायब असलेल्या आरोपींकडून जीवाला धोका होऊ शकतो, अशी भीती गावातील अनेकांना वाटत आहे. 

पोलीस तपासाच्या निमित्ताने अनेक शक्यता तपासून बघत आहेत. मागील काही आठवड्यांपासून गावांमध्ये सुरू असलेल्या घडामोडी, मॉब लिंचिंगच्यावेळी आढळलेले विशिष्ट राजकीय पक्षांचे स्थानिक नेते, त्यांचे हेवेदावे आणि राजकारण अशा सर्वच दृष्टीकोनातून तपास होत आहे. लवकरच ठोस पुरावे न्यायाधीशांसमोर सादर केले जातील असे तपास पथकाच्यावतीने राज्याचे गृहमंत्रालय सांगत आहे. 

साधूंचे उत्तर प्रदेश कनेक्शन

पालघर प्रकरणाशी संबंधित साधू उत्तर प्रदेशमधील होते. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील नागरिक साधू प्रकरणाशी संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.

हत्येमागे विशिष्ट विचारांच्या लोकांचा हात?

साधूंच्या हत्येमागे विशिष्ट विचारांच्या लोकांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. राज्याची क्राईम ब्रँच या संदर्भात सखोल तपास करत आहे. ठोस पुरावे हाती आल्यानंतर आणखी काही ध)रपकड होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी