[video] लोकलच्या दरवाजावरील स्टंटबाजी जीवावर बेतली, खांबावर आदळून तरूणाचा मृत्यू

ठाणे
Updated Dec 30, 2019 | 20:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

स्टंट करू नये, स्टंट तुमच्या जीवावर बेतू शकतात असे आवाहनही प्रवाशांना केले जाते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत अनेक तरूण लोकलमध्ये लटकत वेगवेगळ्या प्रकारे स्टंटबाजी करताना दिसतात. ही स्टंटबाजी जीवावरही बेतू शकते.

Train stunts kill youth from Kalyan
लोकलच्या दरवाजावरील स्टंटबाजी जीवावर बेतली, खांबावर आदळून तरूणाचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • कल्याणचा रहिवासी असलेला एक २० वर्षीय तरूण अशाचप्रकारे स्टंटबाजी करत असताना खांबावर आदळल्याने मृत्यूमुखी पडला आहे.
  • दिवा-मुंब्रा या स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.
  • दिलशाद लोकलच्या दारावर उभा राहून लटकत स्टंटबाजी करत होता. तर त्याचा मित्र तो स्टंटबाजी करत असतानाचा व्हिडिओ काढत होता.

ठाणे: लोकल प्रवास करताना अनेक सूचना रेल्वेकडून केल्या जातात. स्टंट करू नये, स्टंट तुमच्या जीवावर बेतू शकतात असे आवाहनही प्रवाशांना केले जाते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत अनेक तरूण लोकलमध्ये लटकत वेगवेगळ्या प्रकारे स्टंटबाजी करताना दिसतात. मात्र ही स्टंटबाजी जीवावरही बेतू शकते. असाच प्रकार मध्य रेल्वेच्या मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान घडला आहे. कल्याणचा रहिवासी असलेला एक २० वर्षीय तरूण अशाचप्रकारे स्टंटबाजी करत असताना खांबावर आदळल्याने मृत्यूमुखी पडला आहे. दिवा-मुंब्रा या स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.

कल्याणमध्ये राहणारा २० वर्षीय दिलशाद खान गुरूवारी संध्याकाळी आपल्या एका मित्रासोबत गोवंडीला जात होता. त्यावेळी दिलशाद लोकलच्या दारावर उभा राहून लटकत स्टंटबाजी करत होता. तर त्याचा मित्र तो स्टंटबाजी करत असतानाचा व्हिडिओ काढत होता. दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान असलेल्या खाडीपुलादरम्यान एका खांबावर आदळून तो लोकलमधून खाली पडला. त्यानंतर त्याचा मित्र हुसेन आणि काही लोक त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दिलशादच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्टंट करताना दिलशादचा ज्याप्रकारे मृत्यू झाला तसा कोणताही प्रकार इतर तरूणांनी करू नये असे त्याच्या वडिलांनी म्हटले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी अशीच घटना घडली होती. त्यावेळी मुंब्रा-कळवादरम्यान खांबाला धडकून एका युवकाचा मृत्यू झाला होता. मध्य रेल्वेवर स्टंटबाजी करताना या वर्षात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच वर्षभरात जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान मध्य रेल्वेने स्टंटबाजी केल्याप्रकरणी १७ जणांविरोधात गुन्हे नोंदविले आहेत. अशाप्रकारे स्टंटबाजीला आळा घालण्यासाठी वारंवार रेल्वेकडून उपाययोजना केल्या जातात. मार्च ते जूनदरम्यान रेल्वेने विशेष मोहिम राबविली होती. त्याअंतर्गत झोपडीत राहणारे तरूण आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. लोकलची गर्दी रोज अनेकांचा जीव घेत असते. मात्र, अशाप्रकारची स्टंटबाजी केल्याने हे तरूण आपल्यावर नकळत जीवावर बेतण्यासारखे संकट ओढावून घेतात.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी