VIDEO: आदित्य ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, निवडणूक लढण्याचा निर्णय पक्का?

गावगाडा
Updated Jun 11, 2019 | 11:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Aaditya Thackeray on Contesting Elections: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक बोलावली होती. ही बैठक जवळपास अर्धातास सुरू होती.

Aaditya Thackeray
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ही आगामी विधानसभा निवडणूक लढणार का? या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नसतानाच काल (१० जून) रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलवली. वरळी आणि माहिम या दोन विधानसभा मतदारसंघातील युवासेनेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

आदित्य ठाकरेंनी बोलवलेली ही युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जवळपास अर्धातास चालली. या बैठकीत आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई, माहिम मतदारसंघातील शिवसेना आमदार सदा सरवणकर, वरळी मतदारसंघाचे आमदार सुनील शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. बैठकीसाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकां दरम्यान मिळालेल्या मतांची तपशीलवार आकडेवारी घेऊन उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. तसेच कुठल्या भागात कमी मतं मिळाली का? याचा सुद्धा आढावा घेण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे.

निवडणूक लढवणार का? 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, मी निवडणूक लढवावी किंवा नाही या संदर्भातील निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर नेते मिळून घेतील. सोमवारी युवासेना पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसोबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, या बैठकीत पावसाळ्यात महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या कामांच्या संदर्भात आढावा घेण्यात आला. अशी बैठक प्रत्येक विभागाची होणार आहे. वरळी आणि माहिम मतदारसंघ हे जवळचे असल्याने त्या मतदारसंघातील पदाधिकांची बैठक लवकर बोलवली. आता इतरही पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होईल.

मतदारसंघांची चाचपणी सुरू?

आदित्य ठाकरे विधानसभेची निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. तसेच वरळी, माहिम, वांद्रे पूर्व, शिवडी हे मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित असून त्यापैकी एका जागेवरुन आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशीही चर्चा होती. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी वरळी आणि माहिम मतदारसंघातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी