भंडारा : अनेक वर्षांच्या कालखंडानंतर भंडारा जिल्ह्यांत मध्यरात्री हत्तींचे आगमन झाले आहे. ऑगस्ट महिन्यापासून गडचिरोली आणि गोंदियात वास्तव्य करणाऱ्या तब्बल 23 हत्तींचा कळप रात्री साडेबाराच्या सुमारास साकोली तालुक्यात दाखल झालेत. या कळपाने परिसरातील शेती पिकाचे मोठे नुकसान केले. या हत्तींच्या उपद्रवामुळे ग्रामस्थही भीतीच्या छायेत आहेत. (bhandara : A herd of elephants entered the farm, causing fear among the villagers)
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक राज्यातून गोंदिया जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या हत्तींचा कळप नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात यावा, यासाठी वनाधिका-यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र हत्तींनी भंडा-याच्या दिशेने आगेकूच कायम ठेवली होती. अखेरिस मध्य रात्री हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्याची सीमारेषा ओलांडली. पूर्वी नागझिरा डोह जंगलात हत्तींचे वास्तव्य होते. त्यामुळे ब-याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भंडा-यात हत्ती परतले आहे.
अधिक वाचा : Mumbai Crime: अमेरिकन महिलेसमोर कॅब चालकाचं हस्तमैथुन, मुंबईतील धक्कादायक घटना
तर दुसरीकडे या हत्तींच्या कळपाने साकोली तालुक्यातील सानगडी वनक्षेत्रात झाडगाव, केसलवाडा व सिलेगाव लगतच्या शेतात धान शेती तसेच ऊसाचे मोठे नुकसान केले आहे. हत्तीच्या कळपाचे उपद्रव वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या हत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
हत्तींचा कळप दिवसा जंगलात राहतो, रात्री त्यांची ये-जा सुरु असते. ड्रोनच्या माध्यमातून आम्ही हत्तींच्या हालचालींवर नजर ठेवून आहोत. गावक-यांनी सतर्क राहावे, वनाधिका-यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन भंडारा वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक यांनी केले आहे.