मेट्रो कारशेडच्या मुद्यावर उपमुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

गावगाडा
Updated Aug 12, 2022 | 13:15 IST

मेट्रो योजनेविषयी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली.

थोडं पण कामाचं
  • मेट्रो कारशेडच्या मुद्यावर उपमुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
  • मुंबईत मेट्रो तीन या प्रकल्पाची कारशेड तयार करण्यासाठी कांजूरमार्गमधील जागा सोयीची नाही
  • आरे कॉलनीतील मेट्रो तीनच्या कारशेडचे २९ टक्के काम झाले

मुंबईत सार्वजनिक वाहतूक आरामदायी, वेगवान आणि सुखकर व्हावी यासाठी रेल्वे आणि बस सेवा यांच्या सोबतीला मेट्रो सेवा व्यापक स्वरुपात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोचे मुंबईत मोठे जाळे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या मेट्रो योजनेविषयी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली.

मुंबईत मेट्रो तीन या प्रकल्पाची कारशेड तयार करण्यासाठी कांजूरमार्गमधील जागा सोयीची नाही हे लक्षात आले. यानंतरच मेट्रो तीन या प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसीएस सौनिक यांच्या उच्चस्तरिय समितीने मेट्रो तीन या प्रकल्पासाठी कांजूरमार्गची नाही तर आरे कॉलनीतील जागाच सोयीची आहे, असा अहवाल दिला आहे. या परिस्थितीत कांजूरमार्ग येथे मेट्रो तीन या प्रकल्पाची कारशेड नेली तर खर्चात प्रचंड वाढ होईल. प्रकल्पाला आधीच दिरंगाई झाली आहे. आणखी चार ते पाच वर्ष वाया जातील. यामुळे प्रकल्पाच्या खर्चात अफाट वाढ होईल. मेट्रो तीन हा प्रकल्प एक पांढरा हत्ती होऊन जाईल. हे टाळणे आवश्यक आहे; असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फक्त इगोसाठी कांजुरमार्गच्या जागेचा आग्रह धरण्यापेक्षा जे व्यावहारिक आहे ते करणे आवश्यक आहे. आरे कॉलनीतील मेट्रो तीनच्या कारशेडचे २९ टक्के काम झाले आहे. मेट्रो तीन या प्रकल्पाचे ८५ टक्के काम झाले आहे. या परिस्थितीत मेट्रो तीनची कारशेड आरे कॉलनी या ठिकाणी निश्चित केलेल्या जागेत करणे व्यावहारिकदृष्ट्या दीर्घकालीन हिताचे आहे. 

आरेतील कारशेडसाठी एकही नवे झाड कापावे लागणार नाही. चार वर्ष प्रकल्प थांबवून पंधरा-वीस हजार कोटी रुपयांनी किंमत वाढवणे योग्य नाही... हे पैसे जनतेच्या खिशातील पैसे आहेत आणि हे अशा पद्धतीने आम्ही वाया जाऊ देणार नाही.... असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मेट्रो सहा प्रकल्पासाठी कांजुरमार्गची जागा मागितली आहे. पण या मुद्यावरून वाद सुरू आहे. हे प्रकरण मुंबईच्या उच्च न्यायालयात आहे. या परिस्थितीत मेट्रो तीनसाठी कांजुरमार्गच्या जागेचा आग्रह धरून प्रकल्प थांबविणे योग्य होणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

खाते वाटप लवकरच होईल

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप लवकरच होईल. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल... तोवर तुम्हाला बरं आहे, तुम्ही दिवसभरात अनेक वेळेला खाते वाटप करत आहात... आम्ही पेपर फोडून टाकला तर तुम्हाला काम नाही मिळणार... अशा शब्दात माध्यमांना मिष्कीलपणे टोला हाणला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी