VIDEO: पाणी प्रश्नावरून आमदार यशोमती ठाकूर यांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ

गावगाडा
Updated May 14, 2019 | 18:48 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Maharashtra Drought: अमरावती जिल्ह्यात पाणी टंचाईच्या विषयावर आयोजित बैठकीत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पाण्याच्या मुद्द्यावरून संतप्त होत. अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

MLA Yashomati Thakur
आमदार यशोमती ठाकूर यांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ  |  फोटो सौजन्य: ANI

अमरावती: महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती खूपच गंभीर बनली आहे. विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर आहे. प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळाच्या आढावा बैठका घेतल्या जात असून, त्यातून सध्या सुरू असलेल्या उपाय योजना आणि पुढच्या तयारीची माहिती घेतली जात आहे. या बैठकांना लोकप्रतिनिधीदेखील उपस्थित राहत आहेत. अशीच एक सार्वजनिक बैठक वादळी ठरली आहे. अमरावती जिल्ह्यात झालेल्या या आढावा बैठकीत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पाण्याच्या मुद्द्यावरून संतप्त होत अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे. यशोमती ठाकूर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर झाला आहे. या व्हिडिओमुळे ठाकूर यांना टीकेला सामोरं जावं लागतंय तर दुसरीकडं विदर्भातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीचा ही अंदाज येत आहे.

विदर्भात तीव्र पाणी टंचाई

विदर्भात अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीबाबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूरदेखील त्या बैठकीला उपस्थित होत्या. बैठकी दरम्यान चर्चेत ठाकूर यांचा पारा चढला आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी जोर जोरात वाद घालण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळही केली. त्यावेळी त्यांचे समर्थक कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. त्यांनी बैठकीत ‘पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’ अशी घोषणाबाजीही सुरू केली. या सगळ्यात ठाकूर यांनी शिवीगाळ केल्यानं बैठकीला वेगळेच स्वरूप आले.

पाणी न सोडल्यामुळेच राग अनावर : आमदार ठाकूर

व्हिडिओमध्ये यशोमती ठाकूर आपल्या जाग्यावरून उठून अधिकाऱ्यांशी तावातावाने बोलताना दिसत आहेत. त्यात त्यांनी शीवीगाळ केल्याचेही स्पष्ट ऐकू येत आहे. या बैठकीत यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांवर पाण्याच्या बाबतीत दुजाभाव गेल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांची चेष्टा करून त्यांच्यावर हसल्याचा आरोपही केला आहे. त्यांना भडकवण्यासाठीच हा प्रकार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सगळ्या प्रकारावर ठाकूर यांनी त्यांच्या पुढ्यात ठेवलेला पाण्याचा काचेचा ग्लास रागा रागाने फोडला आहे. ही बैठक स्थानिक पाणी टंचाईच्या मुद्द्यावर आयोजित करण्यात आली होती. आमदार ठाकूर यांनी त्यांचा सगळा राग अधिकाऱ्यांवर काढल्याने त्याचीच चर्चा अमरावतीमध्ये सुरू आहे.

या सगळ्याप्रकारावर आमदार यशोमती ठाकूर यांनी आपली बाजू मांडली आहे. त्या म्हणाल्या, ‘संबंधित अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, त्यांनी त्या धुडकावून लावल्या त्यामुळेच मला राग आला आणि मी तो त्याच्यावर व्यक्त केला. गेल्या दोन आठवड्यांपासून आम्ही मतदारसंघातील पाणी टंचाईवर झगडतो आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. पण, भाजप नेत्यांकडून अडवणूक होत असल्यामुळे पाणी सोडण्यात येत नाही.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी