VIDEO: महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई, नक्षलवादी दाम्पत्याला अटक

गावगाडा
Updated Jun 12, 2019 | 11:30 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Maoist Couple arrest by Maharashtra Police: महाराष्ट्रातील पोलिसांनी एक मोठी कारवाई करत नक्षलवादी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या आहेत. छत्तीसगड सरकारने यांच्यावर २० लाखांचे इनाम जाहीर केलं होतं.

maharashtra police arrest maoist kiran kumar narmadaakko alluri krishna kumari
महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई, नक्षलवादी दाम्पत्याला अटक   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: महाराष्ट्र पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. जहाल नक्षलवादी असलेल्या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. किरण कुमार उर्फ किरण दादा आणि त्याची पत्नी अलुरी कृष्णा कुमारी ऊर्फ नर्मदाक्का यांना पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. गेल्या २० वर्षांत नक्षलवादी हल्ल्यात झालेल्या १५० पोलिसांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दाम्पत्याला महाराष्ट्र आणि तेलंगणा पोलिसांनी अटक केलीय. किरण कुमार आणि नर्मदाक्का या दोघांवरही प्रत्येकी २० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. १९९४ पासून सुरक्षा दलावर होत असलेल्या नक्षलवादी हल्ल्यांमागे याच जोडप्याचा हात असल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या हल्ल्यामागे सुद्धा हेच दाम्पत्य असल्याचं समोर आलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले होते. यासोबतच ९ एप्रिल रोजी छत्तीसगडमध्ये भाजप आमदार भिमा मांडवी यांच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या नक्षलवादी हल्ल्यामागे सुद्धा याच दाम्पत्याचा हात असल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्यात आमदार भिमा मांडवी यांच्यासह चार पोलीस जवान शहीद झाले होते.

महाराष्ट्रातील गडचिरोली, आंध्रप्रदेश, छत्तीसगड या परिसरात दाम्पत्याची चांगलीच दहशत निर्माण झाली होती. मात्र, आता या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर या दाम्पत्याला आता हैदराबाद येथून महाराष्ट्रातील गडचिरोली येथे आणण्यात आलं आहे. 

जहाल नक्षलवादी असलेल्या किरण कुमार आणि नर्मादाक्का यांना झालेली अटक म्हणजे नक्षलवाद्यां विरोधातली मोठी कारवाई आहे. तसेच यामुळे नक्षलवाद्यांना एक जोरदार झटका बसला असेल यात शंका नाही. या दाम्पत्याच्या अटकेमुळे आता नक्षलवादी कारवाई करण्यास अधिक गती मिळणार असल्याचं बोललं जात आहे. 

कृष्णा कुमारीचं वय ६० वर्षे असून ती आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथील रहिवासी आहे. कृष्णा कुमारी ही नक्षलवादी चळवळीत गेल्या २२ वर्षांपासून सक्रीय असल्याची माहिती आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी