RANJI TROPHY QUARTER FINALS । मुंबई : आयपीएल संपल्यानंतर सोमवारपासून रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या सत्राला (QUARTER FINALS) सुरूवात झाली आहे. हे सामने सोमवारी खेळवले जाणार आहेत. मध्य प्रदेश, बंगाल, कर्नाटक, मुंबई, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश हे लीग स्टेज मधील सात संघ साखळी टप्प्यातून थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर प्लेट गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये झारखंडच्या संघाने नागालँडचा पराभव करून आता अंतिम आठमध्ये स्थान पक्के केले आहे. सर्व सामने ६-१० जून दरम्यान बंगळुरूमध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जातील. १४-१८ जून दरम्यान बंगळुरूमध्ये उपांत्य फेरी आणि २२-२६ जून दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमवर फायनल खेळवली जाईल. (All eyes on 8 other teams including Bengal, MP, UP and Mumbai, The thrill of Quarterfinals In Bangalore).
अधिक वाचा : राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मतदान करू - आमदार राजू पाटील
मुंबईचा संघ प्रबळ दावेदार म्हणून उत्तराखंडविरुद्ध रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल. जवळपास २२ वर्षांपूर्वी उत्तराखंडचा संघ इथपर्यंत पोहचला होता. तोपर्यंत मुंबईच्या संघाने देशातील सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धेचे विजेतेपद ३४ वेळा जिंकले होते. मुंबईने २००० ते २०२२ दरम्यान आणखी ७ विजेतेपदे पटकावली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे चालू हंगामात आतापर्यंतचा प्रवास मुंबईसाठी सोपा राहिलेला नाही. सौराष्ट्रला गोव्याविरुद्धच्या अंतिम गट सामन्यात बोनस गुणांसह विजय मिळवता न आल्याने मुंबईने अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबईच्या संघाला त्यांचा कर्णधार पृथ्वी शॉ, युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि सरफराज खान यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तसेच उत्तराखंडने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तीन हंगामात दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उत्तराखंडचा कर्णधार जय बिस्ट मुंबईकडून खेळताना पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता आणि आता तो त्याच संघाविरुद्ध पन्हा एकदा खेळणार आहे. उत्तराखंडच्या खेळाडूंना आपल्या गोलंदाजीने विरोधी संघाच्या फलंदाजांवार दबाव राखून ठेवायला आवडेल.
साखळी फेरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत यूपी आणि विदर्भाने शेवटच्या आठमध्ये स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला, पण यूपीने महाराष्ट्राचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रिंकू सिंगने सहा डावांत ३०० धावा करून या हंगामात यूपीच्या संघाकडून सर्वोत्तम फलंदाज म्हणून बाजू सांभाळली आहे. आयपीएलमध्ये चमक दाखवल्यानंतर यश दयाल आणि मोहसीन खान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील, तर प्रियम गर्ग आणि अक्षदीप नाथ फलंदाजीला आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.