ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात सर्वबाद ३६९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दहावा गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ उपहारासाठी (लंच ब्रेक) थांबवण्यात आला. भारताच्या तीन नवोदीत गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी ३ फलंदाजांना बाद केले. (Australia all out 369 against India in Brisbane Test)
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभारला. डेव्हिड वॉर्नर (१ धाव), मार्कस हॅरिस (५ धावा), स्टीव्ह स्मिथ (३६ धावा), मॅथ्यू वेड (४५ धावा), मार्नस लबुशेन (१०८ धावा), टिम पेन (५० धावा), कॅमरॉन ग्रीन (४७ धावा), पॅट कमिन्स (२ धावा), नॅथन लायन (२४ धावा), जोश हेझलवूड (११ धावा) हे खेळाडू बाद झाले. मिचेल स्टार्क २० धावा करुन नाबाद राहिला.
ब्रिस्बेनमध्ये खेळत आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या भारताच्या तीन गोलंदाजांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. मोहम्मद सिराजने एक बळी घेतला. सिराजने ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडत डेव्हिड वॉर्नरला बाद केले. मोहम्मद सिराजने २८ षटकांत १० निर्धाव टाकली आणि ७७ धावा देत १ बळी घेतला.
वॉशिंग्टन सुंदरने ३१ षटकांत ६ निर्धाव टाकली आणि ८९ धावा देत ३ बळी घेतले. भारताकडून त्याने सर्वात प्रभावी कामगिरी केली. सुंदरने स्टीव्ह स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन आणि नॅथन लायन या तीन जणांना बाद केले. टी. नटराजनने २४.२ षटकांत ३ निर्धाव टाकली आणि ७८ धावा देत ३ बळी घेतले. त्याने शतकवीर मार्नस लबुशेन, मॅथ्यू वेड आणि जोश हेझलवूड या तीन जणांना बाद केले. शार्दुल ठाकूरने २४ षटकांत ६ निर्धाव टाकली आणि ९४ धावा देत ३ बळी घेतले. त्याने मार्कस हॅरिस, टिम पेन आणि पॅट कमिन्स या तीन जणांना बाद केले.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी' स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १-१ अशी बरोबरी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने अॅडलेड कसोटी आठ गडी राखून तर भारताने मेलबर्न कसोटी आठ गडी राखून जिंकली. सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. यामुळे ब्रिस्बेन कसोटीचे महत्त्व वाढले आहे. ही कसोटी जिंकणाऱ्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील स्वतःची स्थिती मजबूत करणे शक्य होणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जिंकण्याचे प्रमाण टक्केवारीत मोजले जात आहे. या टक्केवारीला महत्त्व आहे. कसोटी सामने जिंकण्याचे प्रमाण ७३.८ टक्के असल्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. जिंकण्याचे प्रमाण ७०.२ टक्के असल्यामुळे भारत या तक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहे तर जिंकण्याचे प्रमाण ७० टक्के असल्यामुळे न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. ब्रिस्बेन कसोटी जिंकल्यास भारत 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी' जिंकेल तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यातील भारताची स्थिती आणखी मजबूत होईल.