कोविड प्रोटोकॉलमुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची पंचाईत

australia cricket players join ipl after quarantine period आयपीएल २०२०च्या कोविड प्रोटॉकॉलमुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची पंचाईत झाली आहे.

australia cricket players join ipl after quarantine period
कोविड प्रोटोकॉलमुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची पंचाईत 

थोडं पण कामाचं

  • कोविड प्रोटोकॉलमुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची पंचाईत
  • स्पर्धेत उशिरा सहभागी होणार ऑस्ट्रेलियाचे खेळाडू
  • चेन्नईच्या पहिल्या सामन्यात नसेल ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा खेळाडू

दुबईः संयुक्त अरब आमिराती (United Arab Emirates - UAE) येथे १९ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या आयपीएल २०२० (Indian Premier League - IPL) क्रिकेट स्पर्धेसाठी कोविड प्रोटॉकॉल (covid protocol) लागू आहे. या प्रोटोकॉलमुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची पंचाईत झाली आहे. इंग्लंडविरुद्ध वन डे मालिकेत खेळत असलेल्या ज्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांना प्रोटोकॉलमुळे स्पर्धेत उशिरा सहभागी होता येईल. (australia cricket players join ipl after quarantine period)

कोविड प्रोटोकॉलनुसार संयुक्त अरब आमिराती येथे किमान सहा दिवस क्वारंटाइनमध्ये काढावे लागतात. नंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तर खेळाडू स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली स्पर्धा १६ सप्टेंबरला संपणार आहे. आयपीएलसाठी निवड झालेले आणि इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेत सहभागी झालेले खेळाडू आयपीएल सुरू होण्याआधी संयुक्त अरब आमिराती येथे दाखल होऊन क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्पर्धेत खेळत असलेले निवडक क्रिकेटपटू आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात खेळू शकणार नाही. 

स्टीव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स), डेव्हिड वॉर्नर (सनरायझर्स हैद्राबाद), जोश हॅझलवूड (चेन्नई सुपरकिंग्स) हे खेळाडू इंग्लंडविरुद्धची तिसरी वन डे झाल्यानंतर थेट संयुक्त अरब आमिरातीला रवाना होतील, तिथे क्वारंटाइनची मुदत संपल्यावर आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतील. 

चेन्नई सुपरकिंग्स संघातील १३ जणांना कोरोना झाल्याचे संयुक्त अरब आमिरातीमध्ये पोहोचल्यावर लक्षात आले. या १३ जणांमध्ये दोन खेळाडू होते. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्सची टीम जास्त काळजी घेत आहे. हॉटेलबाहेर पडताना प्रत्येक सदस्याला स्वतःच्या गळ्यात एक उपकरण घालावे लागते. या उपकरणाच्या मदतीने संबंधित व्यक्तीचे ट्रॅकिंग केले जाते. 

क्रिकेटपटूंना कोरोना होऊ नये म्हणून स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खेळाडूंना त्यांच्या नियमित डाएटसोबत कोरोनावर मात करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचे सेवन करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. खेळाडूंनी सतत मास्क वापरावे तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर अर्थात सोशल डिस्टंस राखावा असेही त्यांना सांगण्यात आले आहे. खेळाच्या मैदानात मास्क वापरावा की नाही हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य खेळाडूंना देण्यात आले आहे. 

भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर व्हिवो कंपनीने तेराव्या आयपीएलसाठी टायटल स्पॉन्सरशिपमधून माघार घेतली आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी ड्रीम ११ कंपनी टायटल स्पॉन्सरर आहे. आयपीएलचे सामने दुबई, अबुधाबी आणि शारजा येथे प्रामुख्याने खेळवले जातील. स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाईल. स्पर्धेचा पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या सामन्याने आयपीएलची सुरुवात होणार आहे. या सामन्यात हॅझलवूड चेन्नईकडून खेळू शकणार नाही. कोविड प्रोटोकॉलनुसार क्वारंटाइनची मुदत संपल्यावर कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तर पुढल्या आठवड्यात तो स्पर्धेत सहभागी होऊ शकेल. 

याआधी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील २० सामन्यांचे आयोजन संयुक्त अरब आमिराती येथे झाले होते. यावेळी कोरोना संकटामुळे स्पर्धेतील सर्व सामने भारताऐवजी संयुक्त अरब आमिराती येथे होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी