Australian Open 2022: राफेल नदालने एकविसाव्यांदा जिंकले ग्रँडस्लॅम

Australian Open 2022 Final Rafael Nadal beats Daniil Medvedev to win record 21st Grand Slam title : स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने ऐतिहासिक कामगिरी केली. नदालने ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ जिंकून कारकिर्दीतले एकविसावे ग्रँडस्लॅम जिंकण्याची कमाल करून दाखविली.

Australian Open 2022 Final Rafael Nadal beats Daniil Medvedev
नदालने एकविसाव्यांदा जिंकले ग्रँडस्लॅम 
थोडं पण कामाचं
  • राफेल नदालने एकविसाव्यांदा जिंकले ग्रँडस्लॅम
  • २१ ग्रँडस्लॅम जिंकणारा तो जगातील पहिला पुरुष टेनिसपटू
  • रशियाच्या डॅनियल मेदवेदेवचा नदालने अंतिम सामन्यात केला पराभव

Australian Open 2022 Final Rafael Nadal beats Daniil Medvedev to win record 21st Grand Slam title : नवी दिल्ली : स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने ऐतिहासिक कामगिरी केली. नदालने ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ जिंकून कारकिर्दीतले एकविसावे ग्रँडस्लॅम जिंकण्याची कमाल करून दाखविली. रशियाच्या डॅनियल मेदवेदेवचा नदालने अंतिम सामन्यात २-६, ६-७ (५), ६-४, ६-४, ७-५ असा पराभव केला. 

अंतिम सामना ५ तास २४ मिनिटे सुरू होता. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक काळ खेळला गेलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा अंतिम सामना आहे. या सामन्याच्या निमित्ताने नदाल २९व्यांदा ग्रँडस्लॅम दर्जाच्या स्पर्धेत अंतिम फेरीत खेळत होता. नदालने याआधी २००९ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. यंदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत त्याने २१ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला पुरुष टेनिसपटू ठरला. 

स्विर्त्झलंडच्या रॉजर फेडरर आणि सर्बियाच्या नोवाक जोकोविचने प्रत्येकी वीस वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली आहे. नदाल फेडरर आणि जोकोविचला मागे टाकत एकविसाव्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकला.

दुखापतीतून तसेच कोरोनाच्या संसर्गातून सावरल्यानंतर नदाल ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळत होता. याआधी त्याने २०२० मध्ये फ्रेंच ओपन जिंकली होती. ती नदालने जिंकलेली विसावी ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नदाल उपांत्य फेरीत इटलीच्या मात्तेओ बेरेत्तिनी याला हरवून अंतिम फेरीत पोहोचला होता. 

अंतिम सामन्यात पहिल्या सेटमध्ये नदाल सुरुवातीला आगेकूच करत होता. पण नंतर मेदवेदेवने स्वतःच्या खेळात सुधारणा केली आणि पहिला सेट २-६ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना जोरदार टक्कर दिली. हा सेट पण नदाल ६-७ (५) असा हरला. पण तिसऱ्या सेटपासून नदालने खेळात पुनरागमन केले. या सेटमध्ये नदालने मेदवेदेववर मात केली ६-४ अशी बाजी मारली. यानंतर चौथ्या सेटमध्येही नदालने मेदवेदेववर ६-४ अशी मात केली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी दोन सेट जिंकल्यामुळे पाचवा सेट निर्णायक झाला. दोन्ही खेळाडूंनी जोरदार टक्कर दिली. अखेर नदालने अनुभव पणाला लावला आणि निर्णायक सेट ७-५ असा जिंकत स्पर्धा जिंकली. 

रशियाच्या डॅनियल मेदवेदेवचा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पराभव झाला. याआधी मागच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सर्बियाच्या नोवाक जोकोविचने मेदवेदेवचा अंतिम फेरीत पराभव केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी