कोविड प्रोटोकॉलचे पालन करत ९ एप्रिलपासून आयपीएल

BCCI announces schedule for VIVO IPL 2021 कोविड प्रोटोकॉलचे पालन करत ९ एप्रिल २०२१ ते ३० मे २०२१ या कालावधीत भारतात आयपीएल स्पर्धेचे आयोजन होणार आहे. हा इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेचा चौदावा हंगाम आहे.

BCCI announces schedule for VIVO IPL 2021
कोविड प्रोटोकॉलचे पालन करत ९ एप्रिलपासून आयपीएल 

थोडं पण कामाचं

  • कोविड प्रोटोकॉलचे पालन करत ९ एप्रिलपासून आयपीएल
  • बारा सामने अहमदाबादमध्ये होणार
  • पहिल्यांदाच प्रत्येक संघाला त्याचे घरचे मैदान सोडून अन्य चार शहरांतील मैदानांमध्ये खेळावे लागेल

अहमदाबाद: कोविड प्रोटोकॉलचे पालन करत ९ एप्रिल २०२१ ते ३० मे २०२१ या कालावधीत भारतात आयपीएल स्पर्धेचे आयोजन होणार आहे. हा इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेचा चौदावा हंगाम आहे. याआधी मागच्यावर्षी कोरोना संकटामुळे आयपीएल २०२० ही स्पर्धा संयुक्त अरब आमिराती येथे पार पडली होती. (BCCI announces schedule for VIVO IPL 2021)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये सामने होतील. अहमदाबादमध्ये होणार असलेले आयपीएलचे सर्व सामने सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलातील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहेत. स्पर्धेचा पहिला सामना ९ एप्रिल रोजी चेन्नईत खेळवला जाणार आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा हा सामना आहे. स्पर्धेचा समारोप ३० मे रोजी अहमदाबाद येथे अंतिम सामन्याने होणार आहे. 

प्ले ऑफ राउंडचे आठ, क्वालिफायर राउंडचे दोन, एलिमिनेटर राउंडचा एक आणि फायनल राउंडचा एक असे बारा सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. बंगळुरू, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये प्ले ऑफ राउंडचे प्रत्येकी दहा सामने होतील. दिल्लीत प्ले ऑफ राउंडचे आठ सामने होणार आहेत. 

यंदा पहिल्यांदाच प्रत्येक संघाला प्ले ऑफ राउंडमध्ये त्याचे घरचे मैदान सोडून अन्य चार शहरांतील मैदानांमध्ये खेळावे लागेल. याआधीच्या १३ हंगामांमध्ये प्रत्येक संघाला प्ले ऑफ राउंडचे ५० टक्के सामने घरच्या मैदानात खेळण्याची संधी होती. तसेच यावेळच्या आयपीएलमध्ये ११ दिवशी दोन सामने असतील. पहिला सामना दुपारी ३.३० वाजता आणि दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता होईल. इतर दिवशी फक्त संध्याकाळी ७.३० वाजता एक सामना असेल. प्रत्येक संघाला प्ले ऑफ राउंड दरम्यान फक्त तीन वेळाच प्रवास करावा लागणार आहे.

आयपीएलचे प्ले ऑफ राउंडचे सामने प्रेक्षकांविना पार पडतील. शेवटच्या टप्प्यातील चार सामन्यांसाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करत मर्यादीत प्रेक्षकांना परवानगी देण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ८४ हजारांपेक्षा जास्त आहे. जानेवारी महिन्यात देशातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र होते. पण फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीकडे असेल. त्यांना आयपीएल विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे.

रोहित शर्माची कमाल

मागच्या वर्षी (२०२०) १० नोव्हेंबर रोजी तेराव्या आयपीएल स्पर्धेची फायनल मॅच झाली. ही मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा याची कारकिर्दीतील २००वी आयपीएल मॅच होती. या मॅचमध्ये विजय मिळवून देत पाचव्यांचा स्वतःच्या नेतृत्वात मु्ंबई इंडियन्सला आयपीएल चॅम्पियन करणारा रोहित शर्मा हा आयपीएलच्या तेरा सीझनमधील सर्वाधिक यशस्वी कॅप्टन झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या पाच आयपीएल स्पर्धा जिंकल्या. रोहित शर्माने मुंबई इंडियन्स या एकाच टीमकडून १५० पेक्षा जास्त मॅच खेळल्या आहेत. सातत्याने एकाच टीमकडून सर्वोत्तम खेळी करणारा रोहित शर्मा हा खऱ्या अर्थाने आयपीएल स्टार प्लेअर झाला. फायनलमध्ये कॅप्टनला साजेशी खेळी करणाऱ्या रोहितने अर्धशतक झळकावले. त्याने ६८ धावा केल्या होत्या. 

रोहित शर्माच्या १२ मॅचमध्ये ३३२ धावा

रोहित शर्माने आयपीएल स्पर्धेच्या तेराव्या हंगामात दुखापतीमुळे काही मॅचमध्ये विश्रांती घेतली. त्याने स्पर्धेतील १२ मॅच खेळून एकदा नाबाद राहण्याची कामगिरी केली. तसेच त्याने संयुक्त अरब आमिराती येथे झालेल्या २०२०च्या आयपीएल स्पर्धेत ३३२ धावा केल्या. यात ८० धावा ही सर्वोत्तम खेळी होती. रोहितने तेराव्या आयपीएलमध्ये तीन अर्धशतके झळकावली. यातले तिसरे अर्धशतक तेराव्या आयपीएलच्या फायनल मॅचमधले होते. आयपीएलच्या १३ सीझनमध्ये मिळून २०० मॅच खेळणाऱ्या रोहित शर्माने २८ वेळा नाबाद राहण्याची किमया साधत ५,२३० धावा केल्या. यात नाबाद १०९ धावांची सर्वोत्तम खेळी आहे. रोहित शर्माने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एक शतक आणि ३९ अर्धशतके झळकावली आहेत. 

आयपीएल २०२० - तेरावा हंगाम - पुरस्कार विजेते

मॅन ऑफ द मॅच - ट्रेंट बोल्ट

इमर्जिंग प्लेअर - देवदत्त पडिक्कल

व्हॅल्युएबल प्लेअर - जोफ्रा आर्चर

पेटीएम फेअरप्ले अॅवॉर्ड - मुंबई इंडियन्स

सुपर स्ट्रायकर - कायरन पोलार्ड

मोस्ट सिक्सेस - इशान किशन

गेम चेंजर - केएल राहुल

ऑरेंज कॅप - केएल राहुल

पर्पल कॅप - कगिसो रबाडा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी