इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या २ कसोटींसाठी होणार भारतीय संघाची निवड

आज ब्रिस्बेन कसोटी सामन्याचा निर्णायक दिवस आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या महत्त्वाच्या दिवशी भारतात निवड समितीची बैठक होत आहे.

BCCI set to pick Indian squad for England Test series
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या २ कसोटींसाठी होणार भारतीय संघाची निवड  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या २ कसोटींसाठी होणार भारतीय संघाची निवड
  • रजेवर असलेला विराट कोहली पुन्हा संघात परतणार
  • संघातील इतर खेळाडूंची निवड करण्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक होणार

मुंबईः आज ब्रिस्बेन कसोटी सामन्याचा निर्णायक दिवस आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ही कसोटी जिंकणारा संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकणार आहे. या महत्त्वाच्या दिवशी भारतात निवड समितीची बैठक होत आहे. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या २ कसोटींसाठी भारतीय संघाची निवड होणार आहे. ही निवड करताना खेळाडूंच्या कामगिरीचा तसेच त्यांच्या फिटनेसचा गंभीरपणे विचार केला जाणार आहे. (BCCI set to pick Indian squad for England Test series)

कौटुंबिक कारणामुळे रजेवर असलेला विराट कोहली पुन्हा संघात परतणार आहे. संघातील इतर खेळाडूंची निवड करण्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला निवड समितीचे सर्व सदस्य उपस्थित असतील. सुनिल जोशी, देबाशिष मोहंती, हरविंदर सिंह आणि अॅबी कुरुविला हे निवड समितीचे इतर सदस्य आहेत. यावेळी निवड समितीवर गोलंदाजांचे वर्चस्व आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पहिल्यांदाच संघ निवडणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशी परतत असलेला भारतीय संघ फेब्रुवारी पासून मायदेशातच इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत पहिली आणि १३ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत दुसरी कसोटी होणार आहे. हे दोन्ही सामने चेन्नईत एमए चिदंबरम स्टेडियम येथे होणार आहेत. या सामन्यांसाठी निवड समिती आज (मंगळवार, १९ जानेवारी २०२१) संघ निवडणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या इतर सामन्यांसाठी संघ निवडीची प्रक्रिया नंतर होणार आहे.

कसोटी खेळणारे भारताचे अनेक खेळाडू सध्या दुखापतींनी त्रस्त आहेत. याच कारणामुळे खेळाडूंच्या फिटनेसचा विचार करुन त्यांची संघात निवड केली जाणार आहे. 

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे पोटाचे स्नायू दुखावले आहेत. फलंदाज हनुमा विहारी याला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. गोलंदाज रविचंद्रन अश्विन याला पाठदुखीचा त्रास होत आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याला अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. फलंदाज केएल राहुल याच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव याला काफ इंज्युरी झाली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. वेगवान गोलंदाज इरफान पठाण तर आधीपासूनच दुखापतीमुळे विश्रांती घेत आहे. तो दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला नव्हता. या सर्व खेळाडूंच्या दुखापतींचा आढावा घेतला जाणार आहे. मयंक अग्रवाल आणि यष्टीरक्षक रिषभ पंत या दोघांना खेळताना दुखापती झाल्या, मात्र ते फिजिओकडून उपचार घेतल्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथी कसोटी खेळत आहेत. यामुळे या दोघांविषयीची चिंता कमी झाली आहे. बाकीच्या खेळाडूंच्या दुखापतींचा आढावा घेऊन नंतर त्यांचा विचार इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी होणार आहे.

निवड समितीने पहिल्या दोन कसोटींसाठी निवडलेला भारतीय संघ २७ जानेवारीपासून बायो बबलमध्ये दाखल होणार आहे. सर्व खेळाडूंना काटेकोरपणे कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी