स्टोक्सची अविश्वनीय खेळी, इंग्लंडला विजय मिळवून दिलाच; पण इतिहासही रचला!

Ben Stokes: बेन स्टोक्सच्या अविश्वसनीय शतकाच्या जोरावर इंग्लंडने अॅशेस सीरीजमधील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर अवघ्या १ विकेटने विजय मिळवला. 

Ben_Stokes
अविश्वनीय स्टोक्स, इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला!  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • इंग्लंडने पहिल्यांदा चौथ्या डावात ३५० हून अधिक धावांचा पाठलाग करुन मिळवला विजय 
  • स्टोक्सने १३५ धावांची नाबाद खेळी करुन इंग्लंडला मिळवून दिला विजय 
  • दहाव्या विकेटसाठी जॅक लीचच्या साथीने रचली ७६ धावांची भागीदारी 

लीड्स: बेन स्टोक्सच्या अविश्वसनीय शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ३५९ धावांचा यशस्वी पाठलाग करत १ विकेट शिल्लक ठेऊन विजय मिळवला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान इंग्लंडने ३ विकेट गमावून १५६ धावा केल्या होत्या. त्यामुळे चौथ्या दिवशी इंग्लंडला २०३ धावांची तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ७ विकेट्सची गरज होती. पण या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयामध्ये अडथळा बनून उभा राहिला तो इंग्लंडचा संकटमोचक बेन स्टोक्स. यावेळी स्टोक्सने फक्त शतकच ठोकलं नाही तर इंग्लंडला अशक्य असा विजय देखील मिळवून दिला. १४२ वर्षात क्रिकेट इतिहासात इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदाच चौथ्या डावात ३५० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. या विजयामुळे मालिकेत इंग्लंडने १-१ अशी बरोबरी साधली आहे. 

चौथ्या दिवशी फंलदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात फार चांगली झाली नाही. कारण की, त्यांचा कर्णधार जो रुट फक्त दोनच धावा करुन बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या जॉनी बेयरस्टो आणि स्टोक्सने डाव पुढे नेला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ८६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यामुळे इंग्लंडची धावसंख्या २०० च्या पार पोहचली. पण २४५ धावा झालेल्या असताना बेयरस्टो हा बाद झाला. यावेळी बेयरस्टोने ३६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर बटलर आणि वोक्स हे अवघ्या १-१ धावा करुन माघारी परतले. बटलरला ट्रेविस हेडने रन आऊट केलं तर वोक्सला हेझलवूडने बाद केलं. त्यामुळे २६१ धावांवर ७ बाद अशी इंग्लंडची अवस्था झाली होती. 

इंग्लंडची बिकट परिस्थिती असताना देखील स्टोक्सने एक बाजू चिकाटीने लावून धरली. त्याने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून धावसंख्या वाढविण्यास सुरुवात केली. पण जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड हे देखील फार मोठी खेळी करु शकले नाही. २८६ धावांवर इंग्लंडचे ९ गडी बाद झाले होते. त्यामुळे सर्वांनीच आशा सोडल्या होत्या. पण स्टोक्सने मात्र अजिबात विश्वास गमावला नव्हता. त्याने शेवटचा फलंदाज लीचला हाताशी धरुन मोठी खेळी केली. लीचने देखील उत्तम फलंदाजी करता स्टोक्सला उत्तम साथ दिली. यावेळी स्टोक्सने ४४ चेंडूत ७४ धावांची तडाखेबंद खेळी करत इंग्लंडला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला. 

स्टोक्सने १९९ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यावेळी त्याने ८ चौकार आणि ७ षटकार ठोकले. २१९ चेंडूत स्टोक्सने १३५ धावांची नाबाद खेळी केली. शेवटच्या ३५ धावा करताना त्याने ३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. 

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने विजयाची एक चांगली संधी गमावली. कारण जेव्हा इंग्लंडला विजयासाठी फक्त दोन धावांची गरज होती त्यावेळी स्टोक्सने एक चांगला फटका मारुन धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी लीच देखील अर्ध्या क्रिजपर्यंत आला होता. पण स्टोक्सने त्याला माघारी पाठवलं. पण त्याचवेळी फिल्डरने गोलंदाज नॅथन लायनकडे थ्रो केला होता. पण तो थ्रो पकडता न आल्याने ऑस्ट्रेलियाने विजयाची मोठी संधी गमावली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...