बॉक्सर डिंको सिंह: प्रदार्पण करताच आणलं सुवर्ण; तैमुरसह जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या बॉक्सराला चारली धूळ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 10, 2021 | 14:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

माजी भारतीय बॉक्सर आणि आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवणारे डिंगको सिंह यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. गेल्यावर्षी त्यांना कोरोनाची लागणही झाली होती, पण त्यातून ते लवकरच बरे झाले.

Former boxer Dingko Singh
बॉक्सर डिंको सिंहची बॉक्सिंग पाहून तैमूरने सोडल होतं मैदान  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • अवघ्या ४२ व्या वर्षी सर्वश्रेष्ठ मुष्ठीयुद्धा डिंको सिंह यांचं निधन
  • भारतातील अनेक बॉक्सरचे प्रेरणास्थान राहिले डिंको सिंह
  • 1 जनवरी 1979 मध्ये मणिपूरच्या एका गावात डिंको सिंह यांचा जन्म झाला होता.

नवी दिल्ली : आजचा दिवस क्रीडा विश्वासाठी (Sports World) एक काळा दिवस ठरला. विशेषत:भारतीय बॉक्सरांवर (Indian boxers) आज दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज सर्वश्रेष्ठ मुष्ठीयुद्धा डिंको सिंह (Best boxer Dinko Singh) यांचं निधन झाले आहे. अवघ्या ४२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते काही वर्षापासून यकृतच्या कर्करोगाशी (Liver cancer) झुंज देत होते. त्याच उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग (Corona infection) झाला. अनेक अनेकांना धूळ चारणारे डिंको सिंह यांनी कोरोनालाही मात दिली, पण कर्करोगामुळे त्यांची जीवनाची झुंज अपयशी ठरली.

भारतात आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्वश्रेष्ठ बॉक्सरांपैकी ते एक बॉक्सर होते. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांच्या बॉक्सिंगमुळे (Boxing)भारतात बॉक्सिंगला मोठी लोकप्रियता मिळाली. 1998 साली अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) मिळवणारे डिंको सिंह हे भारतातील अनेक बॉक्सरचे प्रेरणास्थान राहिले आहेत. सहा वेळा विश्वविजेती मेरी कोम, सरिता देवी आणि विजेंदरसिंग यांच्यासह अनेक बॉक्सरच्या पिढीसाठी ते प्रेरणा बनले.

डिंको सिंह हे भारतीय नौदलात होते आणि तब्येत बिघडण्यापुर्वी प्रशिक्षक (Instructor) म्हणूनही कार्यरत होते.  1 जनवरी 1979 मध्ये मणिपूरच्या एका गावात जन्मलेले डिंको सिंह यांचे नाव सर्वश्रेष्ठ बॉक्सरांमध्ये घेतले जाते. त्याला कारणीभूत आहे, त्यांची मेहनत आणि त्यांची कामगिरी. बॉक्सिंगमध्ये प्रदार्पण करताच एका वर्षातच त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं. डिंको यांनी  विश्वातील मुख्य बॉक्सरांना मात दिली आहे. डिंको यांचे सुरुवातीचे काही दिवस खूप हलाकीचे होते. त्यांचं पालन-पोषण एका अनाथालयात झाले आहे. 

डिंको सिंह यांचा सर्वश्रेष्ठ बॉक्सर बनण्याचा प्रवास 

नगंगोम डिंको सिंह यांना डिंको नावाने ओळखलं जातं. भारतीय क्रीडा प्राधिकरणाद्वारे घेण्यात आलेल्या विशेष खेळ योजनेच्या प्रशिक्षकांनी डिंकोमधील प्रतिभा पाहिली आणि डिंको यांना एक चमकदार बॉक्सर म्हणून पाहू लागले. मेजर ओ.पी भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली डिंको यांना बॉक्सिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. डिंको यांच्या बॉक्सरची प्रतिभा अवघ्या 10 वर्षात दिसून आली. त्यांनी 1989  मध्ये अंबाला येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवला. या विजयानंतर निवडकर्त्यांचं लक्ष त्यांच्याकडे केंद्रित झाले. 1998 च्या साली बँकॉक आशियाई गेम्सच्या बॉक्सिंग सामन्यांमध्ये त्यांनी एक सुवर्ण पदक मिळवलं, त्यानंतर त्याची सर्वश्रेष्ठ बॉक्सर म्हणून ओळख कायम झाली. 

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये प्रदार्पण 

डिंको यांनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग क्षेत्रात 1997 मध्ये प्रदार्पण केले. प्रदार्पण करताच त्यांनी  1997 मध्ये बँकॉक, थायलँड,मध्ये आयोजित करण्यात आलेल्या किंग्स कपमध्ये विजय मिळवला. याच सामन्यांमध्ये त्यांना सर्वश्रेष्ठ मुष्ठीयुद्धा म्हणजे बॉक्सर म्हणून संबोधण्यात आले. 1998 मध्ये बँकॉकच्या आशियाई गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय बॉक्सरच्या संघात डिंको यांना घेण्यात आले. त्यावेळी कोणाला वाटलं नव्हतं की, डिंको एवढा मोठा पराक्रम करतील. विशेष म्हणजे बँकॉकला निघत असतानाही त्यांना त्यांच नाव संघात घेण्यात आले आहे हे देखील माहिती नव्हते.  हीच स्पर्धा डिंकोसाठी नशीब पालटणारी ठरली आणि त्यांनी 1998 मध्ये 54 किलो वजनाच्या गटात सुवर्ण जिंकत एक नवा इतिहास बनवला. 

सुवर्ण जिंकत बनवला इतिहास

बँकॉकच्या स्पर्धेत सुवर्ण जिंकून डिंको यांनी आपला नावाचा डंका वाजवला होता.  सुवर्ण पदकाच्या प्रवासात त्यांनी उपांत्य फेरीत थायलँडचा उत्कृष्ट आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा बॉक्सर वोंग प्राजेस सोंटाया याला धूळ चारली. वोंगला पराभूत करणं हा एक चमत्कारच मानला जाऊ लागला होता. या स्पर्धेतील  आठवणीतील क्षण म्हणजे अंतिम सामना. या अंतिम सामन्यात डिंको सिंह यांच्या समोर उजबेकिस्तानचा प्रसिद्ध तैमूर तुल्याकोव यांचे आव्हान होते. त्याकाळी तैमूर जगातील पाचव्या क्रमांकाचा बॉक्सर होता. डिंको नुकतेच 51 किलो वजनाच्या गटातून 54 किलो वजनाच्या गटात आले होते. त्यामुळे त्यांचा हा विजय न विसरणारा ठरला. सामन्यादरम्यान डिंको तैमूरपेक्षा सरस पद्धतीने कामगिरी करत होते, त्याच्या या दमदार कामगिरीमुळे प्रतिस्पर्धी तैमूरला चौथ्या फेरीतच रिंग सोडावी लागली होती.  

पुरस्कार 

1998 मध्ये डिंको सिंह यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यासह डिंको यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान डिंको सिंह यांच्या निधनानंतर  अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. 

किरेन रिजीजू यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केले दुःख

केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी डिंको यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे आणि भारतात बॉक्सिंगच्या खेळाची आवड निर्माण करणारे अशा शब्दांत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले आहे, “श्री डिंको सिंह यांच्या निधनामुळे मला खूप दुःख झाले आहे. भारताने दिलेल्या सर्वोत्तम बॉक्सरपैकी एक असलेल्या डिंको यांनी 1998मध्ये झालेल्या बँकॉक आशियाई खेळांमध्ये मिळवलेल्या सुरवर्णपदकामुळे भारतात बॉक्सिंगबद्दलची आवड निर्माण झाली. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. श्रद्धांजली, डिंको.”

भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंहने वाहिली श्रद्धांजली

भारताचा स्टार बॉक्सर असलेल्या विजेंदर सिंहने म्हटले आहे की डिंको यांचे आयुष्य आणि संघर्ष हा येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत असणार आहे. त्याने लिहिले आहे, “या दुःखद घटनेबद्दल मी दुःख व्यक्त करतो. त्यांचे आयुष्य आणि संघर्ष हा येणाऱ्या पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी होवो. या दुःखाच्या काळात त्यांच्या कुटुंबाला शक्ती मिळो.”

मणीपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनीही डिंगको यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे, “श्री एन डिंको यांच्या निधनामुळे मला धक्का बसला आहे आणि दुःख झाले आहे. पद्मश्री पुरस्काराचे मानकरी असलेले डिंगको हे मणीपूरच्या सर्वश्रेष्ठ बॉक्सरपैकी होते. त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना.”

2020मध्ये झाली होती कोरोनाची लागण

डिंको सिंह यांना 2020 साली कोरोनाची लागण झाली होती, मात्र ते या आजारातून लवकरच बरे झाले होते. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात त्यांच्या यकृताच्या कर्करोगावरच्या उपचारांसाठी त्यांना इम्फाळवरून दिल्लीला आणले गेले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी