Bodybuilding competition: मि. युनिव्हर्सच्या नावाखाली खेळाडूंची फसवणूक; स्पर्धेदरम्यान चुकीचे निर्णय, खेळाडूंना अपमानास्पद वागणूक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 23, 2022 | 11:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bodybuilding competition | जगातील सर्वात मोठी शरीरसौष्ठव स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली. मात्र ही स्पर्धा वेगळ्याच वादामुळे चर्चेत आली आहे.

Cheating players under the name of Mr. Universe tournament
मि. युनिव्हर्सच्या नावाखाली खेळाडूंची फसवणूक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जगातील सर्वात मोठी शरीरसौष्ठव स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली.
  • मात्र ही स्पर्धा वेगळ्याच वादामुळे चर्चेत आली आहे.
  • स्पर्धेची फी म्हणून १५ हजार रूपयेही संघटनेकडे जमा केले.

Bodybuilding competition | मुंबई : जगातील सर्वात मोठी शरीरसौष्ठव स्पर्धा (Bodybuilding competition) भारतात आयोजित करण्यात आली. मात्र ही स्पर्धा वेगळ्याच वादामुळे चर्चेत आली आहे. या स्पर्धेसाठी १५० देशांतील १५०० खेळाडूंचा निश्चित सहभाग अशी गर्जना करणाऱ्या इंडियन बॉडीबिल्डींग ॲण्ड फिटनेस फेडरेशनचे (IBBFF) सेक्रेटरी संजय मोरे यांनी मि. युनिव्हर्स स्पर्धेच्या नावाखाली खेळाडूंची फसवणूक केली आहे तसेच नोंदणी फीच्या रूपाने कोट्यवधी रूपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप महिला शरीरसौष्ठवपटू हर्षदा पवार, श्रद्धा आनंद आणि मेनका भाटिया यांनी केला असून शरीरसौष्ठव खेळातील  गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्याचे धाडस दाखवले आहे.

एवढेच नव्हे तर या स्पर्धेदरम्यान आयबीबीएफएफच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक आणि गैरवर्तन केल्याचे देखील गंभीर आरोप केले आहेत. याबाबत आपण कायदेशीर तक्रार करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (Cheating players under the name of Mr. Universe tournament). 

अधिक वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! डीए दरवाढीला लागू शकतो ब्रेक


ही स्पर्धा मि. युनिव्हर्स नसून आर्थिक घोटाळा 

दरम्यान, कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वच खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावत असतात. सर्व खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांना सांगण्यात आले की भारतात मि. युनिव्हर्स होत आहे. या स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच या स्पर्धेत जागतिक पातळीवरील खेळाडू सहभागी होणार आहेत. म्हणून तुम्हीही जोरदार तयारी करा. यानंतर खेळाडूंनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, "त्यामुळे आम्ही प्रचंड मेहनत घेतली. दोन महिने अक्षरश: घाम गाळला. 

भारतातील ८०० हून अधिक खेळाडू 

स्पर्धेची फी म्हणून १५ हजार रूपयेही संघटनेकडे जमा केले. पण मि.युनिव्हर्ससाठी बालेवाडी गाठली तेव्हा आमची फक्त घोर निराशा झाली. नोंदणी फी म्हणून १५ हजार रूपये जमा केले त्याची पावती देखील दिली नाही. फाइव्हस्टार हॉटेलमध्ये निवास देणार होते, पण १२ तासांनी एका रूमचा ताबा दिला ती रूम सुद्धा बालेवाडीतल्या सामान्य रूमपैकीच एक होती. ज्यात तीन-तीन खेळाडूंना एकत्र राहण्यास मज्जाव करण्यात आला. चार दिवसांचे भोजनाचे कूपन दिले पण प्रत्यक्षात जेवण दिलेच नाही. स्वत:च्याच पैशांनी जेवा, म्हणून सल्ला दिला." सर्वात मोठा अपेक्षाभंग स्पर्धेतील खेळाडूंना पाहिल्यावर झाला. जगभरातील 150 देशातील शेकडो खेळाडू खेळणार होते. प्रत्यक्षात ग्वाटेमाला आणि कझाकस्तानचे हाताच्या बोटावर मोजतील इतकेच परदेशी खेळाडू आले होते आणि भारतातून तब्बल आठशेपेक्षा अधिक खेळाडू आल्याची माहिती संजय मोरे यांनीच दिली. 

अधिक वाचा : बिहारच्या मुलावर ऑस्ट्रेलियन तरूणी फिदा

पत्रकार परिषदेत केले गंभीर आरोप

सर्वात धक्कादायक म्हणजे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतीही निवड चाचणी नसल्यामुळे कुणीही या स्पर्धेत खेळायला उतरले. खुद्द संघटनेनेच जो स्पर्धेत खेळेल त्याला सहभाग प्रमाणपत्र मिळणार असल्याचे जाहीर केल्यामुळे शेकडो हौशी खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. एकप्रकारे संघटनेने १५ हजार रूपयांत आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू होण्याचे प्रमाणपत्रच खेळाडूंना विकून मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप शरीरसौष्ठवपटू श्रद्धा आनंद यांनी या पत्रकार परिषदेत केला. ही स्पर्धा मि. युनिव्हर्स नव्हती हा एक आर्थिक घोटाळा होता. खेळाडूंची घोर फसवणूक होती. संघटनेने नोंदणी फीच्या नावाखाली अनधिकृतपणे कोट्यवधी रूपये गोळा केले.

कोणत्याच खेळाडूला १५ हजार रूपयांची पावती दिली नाही. तसेच ऑनलाईन फी भरणाऱ्या खेळाडूंची फी वैयक्तिक खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितली. संघटनेच्या या गैरव्यवहाराची चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी जोर धरत आहे. तसेच पॅम्पलेट प्रमाणे वितरित केलेले निनावी प्रमाणपत्र रद्द करावेत. त्याची कोणत्याही गोष्टीसाठी दखल घेऊ नये, असे आवाहनही या खेळाशी संबंधित सर्व सरकारी क्रीडा संस्थांना केले.

संजय मोरेंचा मनमानी कारभार या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाला. जी खेळाडू महिलांच्या बॉडीबिल्डिंग प्रकारात सहावीसुद्धा येऊ शकत नाही ती प्रिया मजुमदार स्पर्धेत अव्वल आली. हेसुद्धा मोरेंच्या कृपेमुळे झाले. हा निकाल अथवा निर्णय महिला शरीरसौष्ठव गटातील एकाही खेळाडूला पटला नाही. त्यासाठी सर्व खेळाडूंनी पंच आणि संघटनेकडे कंपेरिजनची मागणी केली, पण त्यांनी आम्हाला दादही दिली नाही. याउलट अपमानास्पद वागणूक दिल्याचे रौप्यपदक विजेत्या हर्षदा पवारने सांगितले.

अधिक वाचा : बॅरिकेटस तोडून शिवसैनिक घुसले राणा दाम्पत्याच्या घरात

मेनका भाटियाने केले गंभीर आरोप

लक्षणीय बाब म्हणजे दिल्लीच्या मेनका भाटियाने आपल्याविरूद्ध दिलेल्या चुकीच्या निर्णयाबाबत बोलण्यासाठी संजय मोरे यांच्याकडे दाद मागितली, पण कुणीही तिचे ऐकून घेतले नाही. उलट अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे ती खचून गेली. आपल्याला वरिष्ठांना धीर देण्याऐवजी हद्द पार करून विविध आरोप केले असल्याचे मेनका भाटियाने सांगितले. "मी चौथी आली पण मला जे प्रमाणपत्र दिले त्यावर माझेच नाव नव्हते. फक्त चौथा क्रमांक लिहून दिलं. मला जे मेडल दिले ते ज्यूनियर गटाचे होते तर राष्ट्रीय स्पर्धा ६२ वी होती, पण मेडलवर ६० वे वर्ष लिहिण्यात आले होते. हा सर्व प्रकार लाजीरवाणा होता. खरच हे कळत नाही की ही स्पर्धा होती की थट्टा? कुणालाच या स्पर्धेचे अजिबात गांभीर्य नव्हते. आमच्या मेहनची कोणालाच किंमत नव्हती जर बलात्कार हे महिलांचे शोषण करते तर हा प्रकार आमच्या खेळाचे शोषण करत आहे. याविषयी आवाज उठविण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्ही या संघटनेच्या गैरकारभारावर खुल्या रितीने टीका केली आहे. आज आम्ही तिघी आहोत. पण भविष्यात हा आकडा वाढत जाणार आहे, त्यामुळे आता काहीही झाले तरी आम्ही मागे हटणार नाही." असा निर्धार दिल्लीच्या मेनका भाटिया हिने व्यक्त केला. 

संजय मोरे कसला डॉक्टर?

या गैरव्यवहारामुळे संजय मोरे सर्वांच्याच निशाण्यावर आले आहेत. दरम्यान शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस सुरेश कदम यांनी मोरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, "संजय मोरे कधी डॉक्टर झाला हे कळलेच नाही. मी त्याला मागील २५ वर्षे ओळखत आहे. त्याने ही डॉक्टराची पदवी कुठून विकत घेतली. हा प्रश्न मला पडला आहे. डॉक्टर संजय मोरे म्हणून मिरवणाऱ्या मोरेंनी याबाबत माहिती द्यावी. तसेच शरीरसौष्ठ स्पर्धेत कोणत्याही संघटनेला आयओएची मान्यता नाही आहे. जर ही मान्यता आपल्याकडे असल्याचे सांगत असेल तर ही केवळ फसवणूक आहे." मि. युनिव्हर्सच्या नावाखाली खेळाडूंवर अन्याय झाला आहे. आपण महिला खेळाडूंच्या सोबत आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासनही सुरेश कदम यांनी दिले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी