धोनीच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी, 'या' तारखेला धोनी करणार कमबॅक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Feb 15, 2020 | 12:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयपीएलच्या १३व्या हंगामाची सुरूवात येत्या २९ मार्चपासून होत आहे. यासाठी धोनी लवकरच सराव सुरू करणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आणि चाहते त्यांच्या थालाची आता वाट पाहत आहेत.

Confirmation on Dhoni's comeback on this date
धोनीच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी, 'या' तारखेला धोनी करणार कमबॅक  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.
  • धोनी लवकरच क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला दिसणार आहे.
  • चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आणि चाहते त्यांच्या थालाची (लिडर) आता वाट पाहत आहेत.

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. धोनी लवकरच क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला दिसणार आहे. हो हे खरं आहे, आतापर्यंत केवळ चर्चेत असलेली ही बातमी आता पक्की झाली आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामाची सुरूवात येत्या २९ मार्चपासून होत आहे. यासाठी धोनी लवकरच सराव सुरू करणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आणि चाहते त्यांच्या थालाची (लिडर) आता वाट पाहत आहेत.

महेंद्रसिंग धोनीने गेल्या वर्षी १० जुलै रोजी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मॅनचेस्टरमध्ये वर्ल्ड कपमधील न्यूझीलंडविरूद्धच्या सेमीफायनलमध्ये धोनी खेळला होता. या सामन्यात धोनी धावबाद झाला आणि भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मिलीमीटरच्या एका चुकीमुळे धोनी मैदान, सराव सत्र आणि क्रिकेटपासून दूर झाला.

गेल्या काही महिन्यात धोनीच्या निवृत्तीबद्दल देखील चर्चा झाली. अनेकांनी त्याच्या क्रिकेट न खेळण्याबद्दल देखील शंका उपस्थित केली होती. धोनीच्या भविष्यातील योजनेसंदर्भात स्वत: धोनीकडून किंवा बीसीसीआयकडून देखील काहीच बोलले गेले नव्हते. आयपीएलमध्ये धोनी खेळणार हे आधीच निश्चित झाले होते. आता या स्पर्धेतील कामगिरीवर त्याचे भारतीय संघातील स्थान ठरणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका कार्यक्रमात निवृत्तीसंदर्भातील प्रश्नावर धोनीने जानेवारीपर्यंत मला काही विचारू नका असे म्हटले होते.

गेल्या सात महिन्यांत धोनी फक्त एकदाच नेटमध्ये सराव करताना दिसला. रांचीमध्ये झारखंड रणजी संघासोबत त्याने सराव केला होता. सरावाच्यावेळी देखील धोनीने त्याचा जुना फॉर्म दाखवला होता.

धोनी २९ फेब्रुवारी रोजी चेन्नईत दाखल होणार आहे. १ मार्चपासून तो संघासोबत सरावाला सुरूवात करणार आहे. सरावासाठी २४पैकी १५ ते १६ खएळाडू असतील. अन्य खेळाडू मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात येतील. आयपीएलमधील पहिला सामना २९ मार्च रोजी चेन्नईविरूद्ध मुंबईचा आहे. त्याआधी चेन्नईच्या खेळाडूंसोबत ३ ते ४ सराव सामने होणार आहेत. हे सामने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहेत. सामने पाहण्यासाठी यावेळी चाहत्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी