कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात सचिनही सहभागी, ‘इतक्या’ लाखांची मदत

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Mar 27, 2020 | 16:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

देशात आणि संपूर्ण जगात क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात सामिल झालाय. त्यानं पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत केलीय.

Sachin Tendulakar
कोरोना विरुद्धच्या लढ्यात सचिनही सहभागी, ५० लाखांची केली मदत  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • कोरोना व्हायरससोबत लढा देण्यासाठी सचिन तेंडुलकरची सरकारला ५० लाखांची मदत
  • २५ लाखांची केंद्र सरकारला आणि २५ लाखांचा राज्य सरकारला करणार मदत
  • सचिन शिवाय पठाण बंधू, धोनी, सौरव गांगुलींनी केली वेगवेगळी मदत

मुंबई: क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सतत कोरोना व्हायरसबाबत जनतेला जागरूक करतांना दिसतोय. सोशल मीडियावर संदेश देत त्यानं अनेकदा कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच राहण्याचं आवाहन केलंय. पण आता सचिनही कोरोना व्हायरसमुळे देशात होणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी मदत करायला पुढे आला आहे. केंद्र सरकारनं देशात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सचिननं एक पाऊल पुढे टाकत कोविड-१९ या महामारीला लढा देण्यासाठी तब्बल ५० लाख रुपये दान केले आहे. सचिननं पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५-२५ लाखांची मदत केलीय.

भारतातील सध्या खेळत असलेल्या आणि माजी खेळाडूंकडून कोरोना विरुद्ध लढण्यासाठी करण्यात आलेल्या मदतीपैकी सचिननं केलेली मदत ही मोठी आहे. अनेक खेळाडूंनी आपला पगार देण्याची घोषणा केलीय. तर अनेकांनी रुग्णांच्या उपचारांसाठी वैद्यकीय उपकरणं दिले आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं ५० लाख रुपयांचे तांदूळ गरिबांना वाटण्याची घोषणा केली आहे.

माध्यम सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘सचिन तेंडुलकरनं २५ लाख रुपये पंतप्रधान मदत निधी आणि २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतलाय. सचिनला दोन्ही ठिकाणी मदत करायची आहे.’

क्रिकेटमधील प्रसिद्ध युसूफ आणि इरफान पठाण या बंधूंनी बडोदा पोलीस आणि आरोग्य विभागाला ४००० फेस मास्क दिले आहेत. तर टीम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीनं पुण्यात एका चॅरिटीद्वारे १ लाखांची मदत केलीय. या क्रिकेटपटूंशिवाय कुस्तीपटू बजरंग पूनिया आणि धावपटू हिमा दासनं आपला पगार देण्याची घोषणा केली आहे. सचिन तेंडुलकर या मदतीशिवाय चॅरिटीसोबतही जोडलेला आहे आणि सामाजिक कार्यांमध्ये नेहमीच सक्रीय असल्याचं आपल्याला दिसतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी