Cricket: जेव्हा सगळी टीमच फक्त 4 रन्सवर बोल्ड होते

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 16, 2019 | 17:24 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Cricket: केरळमध्ये आयोजित एका क्रिकेट मॅचमध्ये संपूर्ण टीमच केवळ ४ रन्स करून ऑल आऊट झालीय. कळस म्हणजे, या टीममधला प्रत्येक जण बोल्ड झालाय. असे अनेक पराक्रम केवळ एका सामन्यात झाले आहेत. या मॅचची सध्या चर्चा आहे.

whole team got out for four
क्रिकेटची संपूर्ण टीम बोल्ड   |  फोटो सौजन्य: Thinkstock

वायनाड: क्रिकेटच्या एका सामन्यात कुठला विक्रम होईल हे सांगता येत नाही. अनेकदा हे विक्रम पुढच्या पिढीला ऊर्जा देणारे असतात. तर काही वेळा हे विक्रम म्हणजे त्या संघावर ओढवलेली नामुष्कीच असते. एखादा खेळाडू सतत शून्यावर बाद होतो. तर काही टीम्स सतत पराभव पत्करून नामुष्कीजनक विक्रम नोंदवतात. पण, केरळमध्ये नुकताच झालेला एक विक्रण सगळ्यात वेगळा म्हणावा लागेल. हा विक्रम ऐकला की तुम्हाला वाटेल की, ही टीम मैदानावर उतरलीच तरी कशाला. म्हणजे, आपण क्रिकेट खेळण्याच्या पात्रतेचे आहोत की नाही, याचा विचार या टीमनं करायला हवा, असं म्हणण्याची वेळ आली. त्याचं झालंय असं की, एक संपूर्ण टीमच केवळ चार रन्स करून ऑल आऊट झालीय. कळस म्हणजे, या टीममधला प्रत्येक जण बोल्ड झालाय. असे अनेक पराक्रम केवळ एका सामन्यात झाले आहेत. क्रिकेटमधला हा आगळा वेगळा पराक्रम ऐकून अनेक जणांनी कपाळावर हात मारून घेतलाय.

एकही रन काढता आली नाही

देशात इतर ठिकाणी जशा स्थानिक स्पर्धा भरतात तशाच स्पर्धा केरळमध्येही भरवल्या जातात. केरळमधल्या मालापूरम जिल्ह्यात वायनाड आणि कासारगौडा या दोन टीममध्ये मॅच खेळवण्यात येत होती. एक चांगला सामना पहायला मिळेल म्हणून, मैदानावर गर्दीही झाली होती. पेरिनथमाला मैदानावर ही मॅच सुरू होती. पण, मॅच जशी सुरू झाली तशी तिथल्या प्रत्येकाची निराशा होत गेली. कासारगौड टीमचा प्रत्येक खेळाडू मैदानावर केवळ हजेरी लावून तंबूत परतत होता. टीममधील एकाही खेळाडूला एकही रन काढता आली नाही. प्रत्येकजण बोल्ड होऊनच माघारी परतत होता. सुरुवातीला वायनाड जिल्ह्याच्या बॉलिंगची तारीफ करावी वाटत होती. पण, वायनाडची बॉलिंग चांगली असण्यापेक्षा कासारगौडच्या खेळाडूंना बॅटिंगच येत नसल्याचे दिसत होते.

टीमनं केल्या चार रन्स

टीममधला एकही खेळाडू एकही रन काढू शकला नाही. पण, टीमनं एकूण चार रन्स केल्या. आश्चर्य वाटलं ना ऐकून? होय खेळाडूंना भोपळा फोडता आला नसला तरी, टीमनं भोपळा फोडला हे कौतुकास्पदच म्हणावं लागेल. अर्थात यात टीमचं योगदान म्हणून काहीच नाही. वायनाडनं दिलेल्या एक्स्ट्रा रन्समुळं कासारगौडला किमान चार रन्स तरी करता आल्या. वायनाडच्या टीमला मॅच जिंकण्यासाठी फक्त पाच रन्सची आवश्यकता होती. अर्थात त्यांनीही त्या पाच रन्स केल्या नसत्या तर, खूपच मोठं आश्चर्य झालं असतं. पण, वायनाडच्या टीमनं पहिल्या ओव्हरमध्ये पाच रन्स करून सामना खिशात टाकला. सामना वायनाडनं जिंकला असला तरी, चर्चा मात्र कासारगौडच्या बॅटिंगचीच सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Cricket: जेव्हा सगळी टीमच फक्त 4 रन्सवर बोल्ड होते Description: Cricket: केरळमध्ये आयोजित एका क्रिकेट मॅचमध्ये संपूर्ण टीमच केवळ ४ रन्स करून ऑल आऊट झालीय. कळस म्हणजे, या टीममधला प्रत्येक जण बोल्ड झालाय. असे अनेक पराक्रम केवळ एका सामन्यात झाले आहेत. या मॅचची सध्या चर्चा आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola