Cricket: ‘१२० कोटी द्या, अन्यथा वानखेडे स्टेडियम खाली करा’

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 22, 2019 | 13:33 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Cricket: केवळ मुंबईकरांसाठीच नव्हे तर, तमाम भारतीयांसाठी मानबिंदू असलेले वानखेडे स्टेडियम सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. राज्य सरकार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यात भाडेकरारावरून वाद सुरू आहे.

wankhede stadium, Mumbai
वानखेडे स्टेडियम वादाच्या भोवऱ्यात  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या भाडेकरारावरून वाद
  • मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि राज्य सरकारची ३ मे रोजी बैठक
  • स्टेडियमच्या भाडेकरारावरून उफाळून आला वाद

मुंबई: भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील मानबिंदू असणारे मुंबईतील वानखेडे स्टेडियम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. महाराष्ट्र राज्य सरकार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यात वानखेडे स्टेडियमवरून वाद उफाळून आला असून, स्टेडियमच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. भाडेकराराच्या नुतनीकरणाची थकीत रक्कम आणि स्टेडियममध्ये विना परवाना करण्यात आलेले बांधकाम हे वादाचे मुद्दे असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुळात वानखेडे स्टेडियमची जागा मुंबई क्रिकेट असोसिएशनची नाही. असोसिएशनकडे स्वतःचै मैदान असावे या विचारातून १९७५च्या आधी वानखेडे स्टेडियम बांधण्याचा विचार सुरू झाला. त्यासाठी राज्य सरकारने असोसिएशनला भाडेतत्वावर जागा दिली. हा करार ५० वर्षांसाठीचाच होता. त्याची मुदत गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात संपली आहे. त्याचबरोबर स्टेडियममध्ये करण्यात आलेले बांधकाम परवानगी न घेता करण्यात आल्याचा आरोप राज्य सरकारने केला आहे. त्यामुळेच मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारने मुंबई क्रिकेट असोसिएशनला नोटिस बजावली आहे. सगळ्या बाबींची दखल घेऊन, असोसिएशनकडे १२० कोटी रुपयांची मागणी केली आहे. जर, असोसिएशनने या रकमेची परतफेड केली नाही तर, स्टेडियमची जागा रिकामी करावी लागणार आहे. त्यामुळे आता स्टेडियमच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.

कसे आहे स्टेडियम आणि भाडे?

एस. के. वानखेडे स्टेडियमची जागा एकूण ४३ हजार ९७७.९३ चौरस मीटर आहे. सध्या स्टेडियममध्ये ३३ हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. २०११मध्ये याच स्टेडियमवर भारताने श्रीलंकेला पराभूत करून वर्ल्ड कप उंचावला होता. त्यामुळे स्टेडियमला ऐतिहासिक महत्त्व आले आहे. भाडे करारानुसार असोसिएशनकडून सरकारला बांधकाम केलेल्या जागेचे एक रुपया प्रति वर्ग यार्ड आणि रिकाम्या जागेचे १० पैसे प्रति यार्ड असे भाडे द्यावे लागते.

बांधकामावरून वाद

क्रिकेट असोसिएशनने तेथे सुरवातीला क्रिकेट सेंटर उभे केले आणि तेथे आता बीसीसीआयचे मुख्यालयदेखील आहे. स्टेडियम परिसरात करण्यात आलेले बांधकाम हे विना परवाना असल्याचा आरोप राज्य सरकारने केला आहे तर, दुसरीकडे २०११च्या क्रिकेट वर्ल्ड कपपूर्वी स्टेडियमचे नुतनीकरण करण्यात आले होते. त्यावेळी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या असा दावा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून करण्यात आला आहे. याबाबत स्टेडियमच्या नव्या बांधकामाचे आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी माहिती दिली आहे. राज्य सरकारने मात्र, यावर आपला रोख स्पष्ट केला असून, नव्या बांधकामाची सर्व फेड करण्यात यावी, असे नोटिसमध्ये म्हटले आहे. राज्य सरकारकडून स्टेडियमची पाहणी केली जाणार असून, येत्या ३ मे रोजी भाडे कराराच्या नुतनीकरणासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीला हजर राहण्याची सूचना असोसिएशनला पाठवण्यात आलेल्या नोटिसमध्ये देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Cricket: ‘१२० कोटी द्या, अन्यथा वानखेडे स्टेडियम खाली करा’ Description: Cricket: केवळ मुंबईकरांसाठीच नव्हे तर, तमाम भारतीयांसाठी मानबिंदू असलेले वानखेडे स्टेडियम सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. राज्य सरकार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यात भाडेकरारावरून वाद सुरू आहे.
Loading...
Loading...
Loading...