Team India Coach: कौन बनेगा टीम इंडिया का कोच? 'या' सहा जणांमध्ये मोठी चुरस

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 13, 2019 | 12:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team India Coach: येत्या १६ ऑगस्टला टीम इंडियाच्या कोचपदासाठी मुलाखती होणार आहेत. त्यात सहा जणांमध्ये विद्यमान कोच रवी शास्त्री यांच्यासह सहा जणांमध्ये चढाओढ असणार आहे. एक नजर टाकुया या चुरस असलेल्या सहाजणांवर

Virat Kohli  Ravi Shastri
कोण असणार टीम इंडियाचा कोच?  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • टीम इंडियाचा नवा कोच कोण असणार? रवी शास्त्री यांचे पारडे जड
  • येत्या १६ ऑगस्टला होणार सहा जणांच्या मुलाखती; फिल सिमंस, टॉम मूडी यांची नावेही चर्चेत
  • विराट कोहलीचे मत ठरणार निर्णायक; कोहलीची शास्त्रींनाच पसंती

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवा कोच कोण असणार ही चर्चा काही थांबलेली नाही. वर्ल्ड कपमध्ये सेमिफायनलमध्ये भारताला न्यूझीलंड विरुद्ध निराशाजनक पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कपनंतर विद्यमान कोच रवी शास्त्री यांचा करार संपत असल्यामुळे त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. मुळात रवी शास्त्री यांना मुख्य कोच करण्याची प्रक्रिया खूप वादात राहिली. कोच अनिल कुंबळे यांच्या शिस्तीला कॅप्टन विराट कोहलीने विरोध केल्यानं, दोघांमध्ये मतभेदांची दरी निर्माण झाली. त्यानंतर कुंबळेने कोच पदाचा राजीनामा दिला आणि पुढे रवी शास्त्री मुख्य कोच झाले. रवी शास्त्री कोहलीशी त्याच्याप्रमाणे जुळवून घेत असल्यामुळे ते कोच पदावर टिकून राहिल्याची क्रिकेट विश्वात चर्चा आहे. नव्या कोच निवडीच्या विषयातही कोहलीने नाक खुपसल्याची माहिती असून, त्याने शास्त्री यांनाच पसंती दिली आहे. कोच निवडीच्या प्रक्रियेत कोहलीचा विचार घेतला जाणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून रवी शास्त्रीच कोच पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. येत्या १६ ऑगस्टला कोचपदासाठी मुलाखती होणार आहेत. त्यात सहा जणांमध्ये चढाओढ असणार आहे. हे सहाजण कोण आहेत. त्यावर एक नजर टाकूया...

रवी शास्त्री (भारत)

भारतीय संघाचे माजी क्रिकेपटू रवी शास्त्री यांना विराट कोहलीने झुकते माप दिले आहे. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं आशिया कप, ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका जिंकली आहे. पण, शास्त्री मुळातच वादात आहेत. कुंबळे यांच्या नाट्यमय गच्छंतीनंतर शास्त्री यांना कोचपदाची धुरा मिळाली आहे. पण, वर्ल्ड कपमध्ये प्रबळ दावेदार असूनही, भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडच्या माऱ्यापुढे नांगी टाकावी लागली. त्यांच्या कोचिंगवर ज्येष्ठ खेळाडूंनी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या उपस्थितीत टीम इंडियाच्या खेळात चढ-उतार पाहायला मिळाला आहे.

लालचंद राजपूत (भारत)

दक्षिण आफ्रिकेत २००७मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० वर्ल्ड कपवेळी लालचंद राजपूत भारतीय टीमचे मॅनेजर होते. त्यानंतर आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सला कोचिंग दिली. त्यावेळी हरभजनसिंग आणि श्रीसंत यांच्यात झालेल्या वादावेळी राजपूत हसत असल्याच्या फोटोवरून मोठा वाद झाला होता. २०१६मध्ये त्यांनी अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळातच अफगाणिस्तानला आयसीसीची पूर्ण सदस्यता मिळाली. पुढे त्यांनी झिम्बाब्वेसाठीही कोचिंग केले. सध्या राजपूत ग्लोबल टी-२० कॅनडामध्ये विनिपेग हॉक्स संघाचे कोच आहेत.

रॉबिन सिंह (भारत)

टीम इंडियाचा एक उत्तम ऑलराउंडर राहिलेल्या रॉबिन सिंह याने मैदानावरील करिअर संपल्यानंतर लगेचच कोचिंग करिअर सुरू केले. २००४मध्ये हाँगकाँग क्रिकेट टीमच्या कोचपदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांचे कोचिंग करिअर सुरू झाले. २००६मध्ये ते इंडिया ए टीमचे कोच होते. पुढे टीम इंडियाच्या फिल्डिंग कोच म्हणून त्यांनी काम पाहिले. त्याच काळात टीम इंडियाला टी-२० वर्ल्ड कप जिंकता आला. आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स, मुंबई इंडियन्स संघांना त्यांनी कोचिंग दिले आहे. जगभरातील तमाम टी-२० लीगमध्ये रॉबिन सिंह कोणत्या ना कोणत्या संघाला कोचिंग देत आहेत. २०११मध्ये त्यांनी अमेरिकेच्या क्रिकेट टीमलाही कोचिंग दिले होते.

माइक हेसन (न्यूझीलंड)

माइक हेसन यांनी न्यूझीलंडला दीर्घकाळासाठी कोचिंग दिले होते. सहा वर्षे कोचिंग दिलेल्या हेसन यांच्या मार्गदर्शनाखालीच न्यूझीलंड टीम २०१५मध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचली होती. २०१८मध्ये त्यांनी न्यूझीलंड टीमचे कोचपद सोडले. २०१९च्या आयपीएल सीझनमध्ये हेसन किंग्ज इलेवन पंजाबचे कोच होते. भारतीय टीमचा कोच होताना पर्सनल इंटरेस्ट आडवे येऊन नयेत, यासाठी त्यांना किंग्ज इलेव्हन पंजाबचे कोचपद सोडावे लागले आहे.

फिल सिमंस (वेस्ट इंडिज)

वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू फिल सिमंस २००२मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी २००४मध्ये झिम्बाब्वेला कोचिंग केले. २००७मध्ये त्यांची आयर्लंडच्या कोचपदी नियुक्ती झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयर्लंडच्या टीमने ऐतिहासिक कामगिरी केली. टीमने २००७ वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेश, पाकिस्तानला पराभूत केले. तर, २०१५च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वेला मात दिली होती. सिमंस यांनी आयर्लंडसाठी २४४ सामन्यांमध्ये कोचिंग केले आणि त्यांना ११ स्पर्धांचे विजेतेपदही मिळवून दिले.

टॉम मूडी (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी यांनी २००१ मध्ये निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी २००५ मध्ये श्रीलंकेला कोचिंग सुरू केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम २००७ वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये पोहोचली. आयपीएलमध्ये त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबला आणि सनरायजर्स हैदराबादला कोचिंग दिले. हैदराबादच्या संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वेळा क्लालिफाइंग राऊंडमध्ये प्रवेश केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Team India Coach: कौन बनेगा टीम इंडिया का कोच? 'या' सहा जणांमध्ये मोठी चुरस Description: Team India Coach: येत्या १६ ऑगस्टला टीम इंडियाच्या कोचपदासाठी मुलाखती होणार आहेत. त्यात सहा जणांमध्ये विद्यमान कोच रवी शास्त्री यांच्यासह सहा जणांमध्ये चढाओढ असणार आहे. एक नजर टाकुया या चुरस असलेल्या सहाजणांवर
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...