Cricket World Cup 2019: धोनीचा सगळ्यांत मोठा गुण कोणता? सांगतोय विराट कोहली

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 15, 2019 | 20:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Cricket World Cup 2019: महेंद्रसिंह धोनीची एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. धोनीसाठी टीम कायम सर्वोच्च स्थानी असते. त्याच्यापुढे धोनीला काहीही दिसत नाही, विराट कोहलीनं म्हटलंय.

MS Dhoni File Photo
महेंद्रसिंह धोनी भारताचा हुकमी एक्का : विराट कोहली   |  फोटो सौजन्य: PTI

नवी दिल्ली : भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी सध्या कॅप्टन नसला तरी, संघाचा अमूल्य घटक आहे, हे कोणीच नाकारणार नाही. किंबहुना धोनीला सोडून भारताची टीम यंदाच्या वर्ल्डकपची कल्पनाही करू शकत नाही. धोनीनेच २०११च्या वर्ल्डकपमध्ये आपल्या चलाख निर्णयांनी भारताला २८ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकून दिला होता. २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये त्याला त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. पण, धोनीने आजवर भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान कोणीच नाकारणार नाही. ज्या संघात केवळ मुंबई, दिल्ली, कर्नाटकच्या खेळाडूंचा दबदबा होता. त्या संघात रांची सारख्या तुलनेने छोट्या शहरातून आलेल्या धोनीने आपले स्थान मजबूत केले. त्याहीपुढे जाऊन संघाचा लौकिक वाढवला. आज त्याने कॅप्टन म्हणून विराट कोहलीकडे सूत्रे दिली आहेत. विराट तुलनेने नवखा कॅप्टन असला तरी तो धोनी कौतूक करताना मात्र थकत नाही. धोनीच्या सगळ्या मोठ्या गुणवैशिष्ट्याचा कोहलीने खुलासा केला आहे.

सगळ्यात अनुभवी खेळाडूचा फायदा 

विराट कोहलीने नुकतीच क्रिकबझला एक मुलाखत दिली आहे. त्या त्यानं संघाची तयारी आणि संघाची जमेची बाजू अशा अनेक विषयांवर वक्तव्य केलं असलं तरी, या सगळ्यात धोनीविषयी त्यानं केलेला खुलासा खूप महत्त्वाचा आहे. धोनीच्या कॅप्टन्सीमध्येच माझ्या करिअरला सुरुवात झाली. त्याच्या मार्गदर्शनाखालीच घडल्याचे कोहली प्रांजळपणे कबूल करतो. धोनीबाबत विराट म्हणाला, ‘मी त्याच्याविषयी (धोनी) काय बोलू? जेवढे बोलावे तेवढे थोडेच म्हणावे लागेल. माझं करिअर सुरू झालं तेव्हाच त्याच्याकडं टीमची धुरा आली होती. अनेकांनी माझ्याप्रमाणेच गेल्या काही वर्षांत त्याला खूप जवळून पाहिलं आहे. या सगळ्यात धोनीची एक गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. ज्यामुळे तो इतरांपेक्षा खूपच वेगळा ठरतो. धोनीसाठी टीम कायम सर्वोच्च स्थानी असते. त्याच्यापुढे धोनीला काहीही दिसत नाही. काहीही असलं तरी तो कायम टीमविषयीच विचार करत असतो. आताच्या वर्ल्ड कप संघात तो सगळ्यात अनुभवी खेळाडू आहे. त्याचा अनुभवच आम्हाला आणखी मजबूत करतो.’

धोनीवर टीका दुदैवी

महान क्रिकेटरचा दर्जा मिळूनही धोनीला अनेकवेळा टीकेला सामोरे जावे लागले आहे. अनेकवेळा रन्स करण्यात अपयश येण्यावरून, रन्स करण्यासाठी जास्त बॉल घेतल्यावरून तर, कधी टार्गेटचा पाठलाग करताना अपयश आल्यावरून धोनीला टीकेला सामोरे जावे लागले आहे. एवढच नव्हे तर, धोनीच्या वर्ल्डकप संघातील स्थानावरूनही प्रश्न उपस्थित केले गेले आहे. अर्थात त्याच्यावर असे प्रश्न उपस्थित करणे दुदैवी असल्याचं विराट कोहलीनं म्हटलंय. यावर विराट कोहली म्हणाला, ‘धोनीवर होत असलेली टीका दुदैवी आहे. मला वाटते लोकांमध्ये संयम नाही. एक खराब दिवस गेला तरी, लोक धडाधड बोलायला लागतात. पण, वास्तव हे आहे की, धोनी सगळ्यात चतूर खेळाडूंपैकी एक आहे. स्टप्सच्या मागे तो अनमोल आहे. त्यामुळे मला बिनधास्तपणे इतर गोष्टींवर लक्ष देता येते.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...