Cricket world cup 2019: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू म्हणतो, भारताची टीम सर्वांत खतरनाक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 15, 2019 | 22:37 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Cricket world cup 2019: शोएब अख्तरने भारताच्या टीमला खूप मजबूत टीम असल्याचं म्हटलंय. वर्ल्ड कपचा प्रमुख दावेदार म्हणून भारताच्या टीमचा शोएबनं उल्लेख केला आहे. विराटला जुन्या चुका टाळण्याचा सल्ला त्यानं दिलाय.

Team India
शोएब अख्तर म्हणतो, टीम इंडिया खतरनाक   |  फोटो सौजन्य: PTI

नवी दिल्ली : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुरू होण्याला आता काही दिवसच उरले आहेत. विजेतेपदाचे दावेदार असल्याचे सांगायला सगळ्याच टीम सरसावल्या आहेत. इंग्लंड आणि वेल्समध्ये होत असलेल्या या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा मागच्याच महिन्यात झोली होती. पण, भारतात आयपीएलचं वातावरण असल्यानं त्याकडं फारसं दिलं गेलं नाही. आता आयपीएल संपल्यानंतर भारताच्या टीमची चर्चा सुरू झाली आहे. भारताच्या या टीमविषयी दिग्गज खेळाडूंनी त्यांची त्यांची मतं व्यक्त केली आहेत. कोणी या टीमला बॅलन्स टीम असल्याचं म्हटलंय तर, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारताच्या टीमला खूप मजबूत टीम असल्याचं म्हटलंय. वर्ल्ड कपचा प्रमुख दावेदार म्हणून भारताच्या टीमचा शोएबनं उल्लेख केला आहे.

शोएब म्हणतो, फिटनेस फार महत्त्वाचा

पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलला शोएब अख्तरने मुलाखत दिली आहे. त्यात त्याने भारताच्या टीमविषयी आपली स्पष्ट मते व्यक्त केली आहेत. शोएब म्हणाला, ‘भारताची टीम सर्वांत जबरदस्त टीम आहे. अर्थात ही टीम खूपच बॅलन्स आहे. भारताची ही टीम दोन वर्षांपूर्वीच तयारी झाली होती. केवळ प्रश्न होता अंबाती रायडूचा.’ शोएबने भारताच्या बोलिंग अटॅक आणि बोलरच्या फिटनेसवरही मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, ‘वर्ल्ड कप ही खूप मोठी स्पर्धा असते. दीर्घकाळ चालते. त्यामुळे फिटनेस हा सर्वांत मोठा मुद्दा असणार आहे. माझ्या माहितीनुसार भारताच्या टीममध्ये मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्याच्या फिटनेसची चिंता आहे. भुवनेश्वर कुमार आता ठीक आहे. पण, भारताची मदार ही जसप्रीत बुमराहवर असणार आहे. मॅचच्या पहिल्या काही आणि शेवटच्या ओव्हरमध्ये बुमराह निर्णायक ठरणार आहे. एखाद्या कसलेल्या बॅट्समनलाही सहज खेळता येईल असा तो बोलर नाही. त्याची बोलिंग अॅक्शन त्याला जास्त धोकादायक बनवते. त्याचा फिटनेस खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मुळात टीमचा कॅप्टन विराट कोहलीच फिटनेसवर खूप लक्ष ठेवून असतो आणि तो इतर खेळाडूंनाही फिटनेसवर लक्ष देण्यासाठी प्रेरीत करतो.’

‘विराटनं चुका टाळाव्यात’

भारताच्या बॅटिंग लाईनअपविषयी भारतातच नव्हे तर इतर देशांच्या खेळाडूंमध्येही खूप चर्चा आहे. त्यातल्या त्यात शिखर धवन विषयी खूप बोलले जात आहे. त्याला शोएब अख्तर अपवाद नाही. शोएब म्हणाला, ‘शिखर धवन सध्या फॉर्ममध्ये दिसत नाही. त्याच्या ऐवजी लोकेश राहुल टीममध्ये येईल. पण, तो पाचव्या मॅचनंतर टीममध्ये येईल.’ विराट कोहलीने आधी केलेल्या चुका टाळाव्यात, असे मत शोएब अख्तरने व्यक्त केले आहे. तो म्हणाला, ‘विराटला आता कॅप्टन म्हणून मजबूत होणं गरजेचं आहे. ओव्हलमध्ये त्यानं ज्या चुका केल्या त्या आता त्यानं पुन्हा करायला नकोत. त्यानं आता आपल्या मनात कोणत्याही शंका ठेवता कामा नयेत. मला वाटते विराट कॅप्टन म्हणूनही या वर्ल्डकपमध्ये वेगळ्या पद्धतीनं उदयाला येईल.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी