आता सेहवाग म्हणतो, ‘मला कोण निवड समिती सदस्य करणार?’

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 12, 2019 | 19:35 IST | टाइम्स नाऊ हिंदी

वीरेंद्र सेहवागचे एक वेगळेच ट्विट सध्या चर्चेत आहे. सेहवागनं ट्विटरवरूनच टीम इंडियाचा निवड समितीत सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी त्यानं भारतीय टीमचा कोच होण्याचीही इच्छा व्यक्त केली होती.

virender sehwag file photo
सेहवागला व्हायचय निवड समिती सदस्य   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • आता सेहवाग म्हणतो, मला निवड समिती सदस्य व्हायचंय!
  • वीरेंद्र सेहवागचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय
  • टीम कोच न होऊ शकलेला सेहवाग म्हणतो मला निवड समिती सदस्य करा!

मुंबई: भारताचा तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवाग निवृत्तीनंतर सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. त्याचे ट्विट भन्नाट असतात. अनेकदा त्या ट्विटचा अर्थ खूप खोलवर असतो तर, काही ट्विट सेहवागमधील ह्युमरची झलक देत असतात. सेहवाग ट्विटरवर कायम सक्रीय असतो. एखादं ट्विट करण्याबरोबरच दुसऱ्यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देण्यातही सेहवाग माहीर आहे. आता सेहवागचे एक वेगळेच ट्विट चर्चेत आहे. सेहवागनं ट्विटरवरूनच टीम इंडियाचा निवड समितीत सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सेहवाग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवत्त झाल्यानंतर आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटशी जोडलेला आहे. यापूर्वी त्यानं भारतीय टीमचा कोच होण्याचीही इच्छा व्यक्त केली होती. पण, त्याला संधी मिळाली नाही. त्यावरही सेहवागनं ‘आपण लॉबिंगमध्ये कमी पडलो, ’ असे ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. आता त्यानं सिलेक्टर होण्याची इच्छा व्यक्त करताना, ‘मला कोण संधी देईल का?’ असा खोचक प्रश्न करून विचार करायची वेळ आणली आहे.

चेष्टा की सेहवाग गंभीर?

सेहवागचे 'मुझे सेलेक्टर बनना है, कौन मुझे मौका देगा?' हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. एकेकाळी सेहवागला टीम इंडियाचा कोच व्हायचे होते. आता सेहवागनं हे ट्विट करून चेष्टा केली आहे की तो तितकाच गंभीर आहे, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. अर्थात त्याचं उत्तर वीरेंद्र सेहवागच देऊ शकतो. जर सेहवागला निवड समितीमध्ये रस आहे तर, त्याचे हे ट्विट भारतीय क्रिकेट नियामक मंडळापर्यंत पोहोचते की नाही हे पहावे लागणार आहे.
सेहवागच उल्लेखनीय करिअर

वीरेंद्र सेहवागने भारताकडून सलामीवीर म्हणून, खेळताना अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. एकेकाळी तो संघाचा अविभाज्य घटक होता. पाकिस्तानात पाकिस्तान विरोधात त्रिशतक झळकावण्याची कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय आहे. त्याने २०१५मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पंधरा वर्षांच्या करिअरमध्ये सेहवागने १०४ कसोटी आणि २५१ वन-डे सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. २००९मध्ये आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये सेहवाग पहिल्या क्रमांकावर होता. वन-डे सामन्यांत ८ हजार २७३ तर, कसोटीमध्ये त्याने ८ हजार ५८६ रन्स केल्या आहेत. वन-डेमध्ये ९६ तर, टेस्टमध्ये सहवागच्या नावावर ४० विकेट्स आहेत. २०१६, २०१७ आणि २०१८मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा मेंटॉर म्हणून त्याने काम पाहिले आहे.

सध्याचे निवड समिती सदस्य आणि त्यांची कामगिरी

  1. एमएसके प्रसाद – विकेटकीपर - १९९८ ते २००० सहा टेस्ट आणि १७ वन-डे सामने
  2. देवांग गांधी – फलंदाज – १९९९ ते २००० या काळात चार टेस्ट आणि तीन वन-डे सामने
  3. शरणदीप सिंह – ऑफ स्पिनर – २००० ते २००३ या काळात तीन टेस्ट आणि पाच वन-डे सामने
  4. जतीन परांजपे – जतीने १९९८मध्ये चार वन-डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले
  5. गगन खोडा – डावखुरा फलंदाज – भारतासाठी केवळ दोन वन-डे सामन्यांचा अनुभव

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
आता सेहवाग म्हणतो, ‘मला कोण निवड समिती सदस्य करणार?’ Description: वीरेंद्र सेहवागचे एक वेगळेच ट्विट सध्या चर्चेत आहे. सेहवागनं ट्विटरवरूनच टीम इंडियाचा निवड समितीत सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी त्यानं भारतीय टीमचा कोच होण्याचीही इच्छा व्यक्त केली होती.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...