IND Vs SL: दीपक चहरनं खेचून आणला विजय; म्हणाला, द्रविड सरांमुळेच केली विजयी खेळी

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 3 विकेटने रोमांचक विजय मिळवला. हातातून गेलेला सामना दीपक चहरने फिरवला

Deepak Chahar pulled the victory
दीपक चहरनं खेचून आणला विजय  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत रोमांचक विजयाचा शिल्पकार दीपक चहरने राहुल द्रविडला दिले श्रेय
  • दीपक चहरने नाबाद 69 धावांची खेळी केली.
  • राहुल द्रविड सरांमुळे आत्मविश्वास आला - चहर

नवी दिल्ली : भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 3 विकेटने रोमांचक विजय मिळवला. हातातून गेलेला सामना दीपक चहरने फिरवत भारताच्या खिशात  मालिका टाकून दिली.  दीपक चहरने नाबाद 69 धावांची खेळी करत संघाला हातातून निसटलेला सामना जिंकून दिला. या विजयानंतर दीपकने विजयाचे श्रेय कोच राहुल द्रविडला दिले आहे.  दीपक चहरने म्हणाला की, राहुल द्रविडच्या विश्वासामुळे टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकलो. देशासाठी मॅच जिंकण्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही. राहुल सरांनी मला प्रत्येक चेंडू खेळून काढण्याचा सल्ला दिला होता.  

दीपक चहर म्हणाला की, राहुल द्रविड यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी  इंडिया ए साठी खेळत होतो तेव्हाही ते कोच होते. मी तिथेही चांगली फलंदाजी केली होती. त्यांनी मला म्हटले होते की, मी सातव्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करू शकतो. टार्गेट जेव्हा 50 च्या अंतरात आले त्यावेळी मला वाटलं आपण जिंकू शकतो, मग मी थोडी रिस्क घेतली, असे तो म्हणाला.  

श्रीलंकेने दिलेल्या 275 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. अवघ्या 197 धावांवर 7 गडी बाद झाल्याने  भारताची जिंकण्याची आशा मावळली होती.  7 गडी बाद असल्यामुळे श्रीलंकेचे पारडे जड होते. मात्र दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारची खेळी निर्णायक ठरली. दोघांनी 84 धावांची अभेद्य भागिदारी करत संघाला सामना आणि मालिका जिंकून दिली. लंकेने दिलेलं आव्हान पार करताना  मागील सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलेला पृथ्वी शॉ अवघ्या 13 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेला ईशान किशनही एक धाव करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार शिखर धवनही 29 धावा करुन बाद झाला.

शिखर धवननंतर सूर्यकुमार यादव आणि मनिष पांडेने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मनिष पांडे 37 धावांवर रनआऊट झाला. मनिषनंतर आलेला हार्दिक पांड्याही खातं न उघडताच तंबूत परतला. त्यानंतर अर्धशतक साजरं करुन सूर्यकुमार यादवही बाद झाला. त्याने 53 धावा केल्या. कृणाल पांड्यावर भारताच्या खेळाची धुरा उरलेली असताना तोही 35 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताने हा सामना गमावला अशी स्थिती असताना दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारने जबाबदारीने खेळी करत टीम इंडियाला विजयापर्यंत नेले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी