कांगारूंना धूळ चारून अजिंक्य रहाणे घरी परतला, मराठमोळ्या पद्धतीने सोसायटीत स्वागत 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मुंबईत परतला. यावेळी त्याच्या सोसायटीत त्याचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.

ajinkya rahane
अजिंक्य रहाणे घरी परतला, मराठमोळ्या पद्धतीने सोसायटीत स्वागत  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • रहाणेच्या नेतृत्वात भारताने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत पराभूत केले
  • पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर रहाणेने संघाची जबाबदारी स्वीकारली होती. 
  • रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या तीनपैकी दोन सामने टीम इंडियाने विजय मिळवला आहे.

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहली, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला 2-1 असे पराभूत केले. हा भारताचा ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसरा कसोटी मालिका विजय आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २ वर्षांपूर्वी ऐतिहासिक विजय मिळविला होता. त्यालाही आता टीम इंडियाने मागे टाकलं आहे.

भारतीय संघाचा नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील विजय हा मागील विजयाच्या तुलनेत आणखी चांगला आहे कारण या वेळी हार न मानण्याच्या धैर्याने भारतीय संघ खेळला. पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या डावात फक्त ३६ धावांवर गारद झालेला भारतीय संघाने मेलबर्नमध्ये शानदार पुनरागमन केले आणि ८ गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. यानंतर, सिडनी कसोटीतील जखमी रविचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारीने शेवटच्या दिवशी शानदार फलंदाजी करून सामना वाचविला. त्याचबरोबर शेवटच्या कसोटीत रिषभ पंतच्या धडाकेबाज फलंदाजी आणि चेतेश्वर पुजाराच्या संयमी खेळीने भारताने हा सामना ३ विकेटने जिंकला. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची किमया पुन्हा एकदा केली आणि ती देखील महत्त्वाचे खेळाडू संघात नसताना. 

मुंबईत परतल्यावर कर्णधार अजिंक्य रहाणेचं भव्य स्वागत

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने ही जबरदस्त कामगिरी करुन दाखवली आहे. रहाणेने विराटच्या अनुपस्थितीत संघाची जबाबदरी यशस्वीपणे सांभाळली आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अशा परिस्थितीत सर्वत्र त्याच्या नेतृत्वाचे कौतुक होत आहे. अशाप्रकारे, मालिका विजयानंतर जेव्हा तो घरी परतला तेव्हा पारंपारिक मराठी शैलीतील नायकाप्रमाणे त्याचे स्वागत केले गेले. ढोल-ताशांच्या गजरात त्याचे त्याच्या इमारतीत स्वागत झाले. यावेळी त्याच्या सोसायटीतील लोकांनी त्याच्यावर फुलांचा वर्षाव देखील केला. 

कर्णधार राहाणे याने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून जी कामगिरी केली आहे. त्याच कामगिरीचे बॅनर देखील त्याच्या सोसायटीत लावण्यात आले होते. ज्यात 5,4,3,2,1,0 असे लिहिलेले होते. म्हणजेच रहाणेने आतापर्यंत ५ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी ४ सामने जिंकले आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामने जिंकले आहेत. त्याच्या नेतृत्वात त्याने २ मालिका जिंकल्या आहेत आणि एक सामना त्याच्या नेतृत्वात ड्रॉ ठरला आहे. तर भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वाखाली एकही कसोटी सामना गमावलेला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी