मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(ICC)च्या ताज्या वर्ल्ड रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत ऋषभ पंत(rishabh pant) ११व्या स्थानावर पोहोचला आहे. ऋषभ पंतचे ७१५ रेटिंग पॉईंट आहे. हा पहिला विकेटकीपर फलंदाज आहे ज्याने ७०० अंकाचा आकडा पार केला आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या करिअरमध्ये सर्वोत्कृष्ट रेटिंग अंक ६६२ अंकापर्यंत पोहोचू शकला असता. याशिवाय फारूख इंजीनियरचे ६१९ अंक होते. धोनीचे सर्वोत्कृष्ट रँकिंग १९वे स्थान होते. १९७३मध्ये फारूख इंजीनियर यांनी करिअरच्या सर्वोत्कृष्ट रँकिंगमध्ये १७व्या स्थानावर पोहोचले होते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच पंत जबरदस्त फॉर्मात आहे. सिडनी कसोटीत पंतने चौथ्या डावात ८७ धावांची खेळी केली होती. याच्या जोरावर भारताला ही कसोटी अनिर्णीत राखण्यास यश मिळाले होते. यानंतर ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या डावात नाबाद ८९ धावांची खेळी केली होती. यामुळे भारताला या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवण्यात यश मिळाले होते. इंग्लंडविरुद्ध चेन्नईमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत पंतने ९१ धावांची खेळी केली होती. यानंतर चेन्नईमध्ये खेळवण्यात आलेलया दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने ७७ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या होत्या.
रवीचंद्रन अश्विन इंग्लंडविरुद्ध्च्या दुसऱ्या कसोटीतील शानदार प्रदर्शनाच्या जोरावर ऑलराऊंडर्सच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला होता. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या चेन्नईमधील दुसऱ्या कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात १०६ धावा केल्या होत्या. तसेच त्याने आठ विकेटही मिळवल्या होत्या. भारताने हा सामना ३१७ धावांनी जिंकला होता. दुसरीकडे कर्णधार कोहली फलंदाजाच्या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. चेन्नई कसोटीत १६१ धावांची खेळी करणाऱ्या भारताचा सलामीवीर रोहित शर्मा नऊ स्थानांनी उडी घेत १४व्या नंबरवर पोहोचला होता.
ऑलराऊंडर्सच्या यादीत अश्विनकडे ३३६ अंक आहेत. या यादीत वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर (४०७) अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंर अश्विनच्या स्पिनचा जोडीदार ४०३ अंकांसह दुसऱ्या, इंग्लंडचा बेन स्टोक्स ३९७ गुणांसह तिसऱ्या आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन ३५२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. अश्विन या यादीत ३३६ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.