Moeen Ali Tweet Reality : नुपूर शर्मा प्रकरणी भारताने माफी मागावी अन्यथा IPL खेळणार नाही, मोईन अलीच्या या ट्विटमागचं सत्य आलं उजेडात

मोहम्मद पैगंबरांविषयी अवमानास्पद विधान करणाऱ्या नुपूर शर्मांच्या वक्तव्यानंतर ब्रिटीश क्रिकेटर मोईन अली याचं एक ट्विट व्हायरल होत होतं. भारतात खेळण्यावर आपण बहिष्कार घालत असल्याचा उल्लेख या ट्विटमध्ये होता. या ट्विटमागचं सत्य आता समोर आलं आहे.

Moeen Ali Tweet Reality
मोईन अलीच्या ट्विटमागचं सत्य आलं उजेडात  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • क्रिकेटर मोईन अलीच्या ट्विटमागचं सत्य
  • बनावट अकाउंटवरचं ट्विट होत होतं व्हायरल
  • प्रत्यक्षात मोईन अलीनं ट्विट केलंच नसल्याचं स्पष्ट

Moeen Ali Tweet Reality | भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अलीनं (Moeen Ali) यासंदर्भात एक ट्विट केलं असून जोपर्यंत भारतीय अधिकारी याबाबत माफी मागत नाहीत, तोपर्यंत आयपीएलचा एकही सामना खेळणार नाही, असा इशारा त्यानं दिल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. यासंदर्भातील मोईल अलीच्या ट्विटचा स्क्रीनशॉटदेखील माध्यमांवर व्हायरल होत होता. मात्र प्रत्यक्षात हे ट्विट बनावट अकाउंटवरून करण्यात आल्याचं आता स्पष्ट झालं आहे. फेक अकाउंटवरून कुणीतरी खोडसाळपणे हे ट्विट केलं असून ते अकाउंट बंद करण्यात आलं आहे. 

क्रिकेट बोर्डाचं स्पष्टीकरण

मोईन अली हा इंग्लंडचा खेळाडू चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळतो. याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डानं माहिती दिली आहे. मोईन मुनीर अली नावाचं एक बनावट अकाउंट उघडण्यात आलं होतं. या अकाउंटवरून हे ट्विट करण्यात आलं होतं. “जर भारताने ईशनिंदेच्या मुद्द्यावरून माफी मागितली नाही, तर मी पुन्हा कधीही भारतात खेळण्यासाठी जाणार नाही. मी आयपीएलवरदेखील बहिष्कार टाकेन”, असं ट्विट या अकाउंटवरून करण्यात आलं होतं. याशिवाय आपल्या सर्व मुस्लीम बांधवांनाही असंच करायला प्रवृत्त करेन, असंही त्यात म्हटलं होतं. 8 जून 2022 रोजी हे ट्विट पब्लिश करण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्ष मोईन अलीचं सोशल मीडिया अकाउंटच नसून कुणीतरी बनावट खातं काढून हा प्रकार केल्याचं लक्षात आल्यावर ते खातं ब्लॉक करण्यात आलं आहे. 

कोण आहे मोईन अली?

मोईन अली हा ब्रिटीश क्रिकेटपटू आहे. भारतात होणाऱ्या इंडियन प्रिमिअर लिगमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज या संघातून तो खेळत असतो. जगभरातील मुस्लीम देशांकडून नुपूर शर्मांच्या विधानाचा निषेध होत असतानाच मोईन अलीचं हे ट्विट समोर आलं होतं. @Moeen_Ali18 या अकाउंटवरून हे ट्विटर करण्यात आलं होतं. हे खातं आता सस्पेंड करण्यात आलं आहे. हे खातं नेमकं कुणी काढलं होतं आणि ते कुठून ऑपरेट होत होतं, याबाबतची कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

अधिक वाचा - Ind vs SA T20 : दिनेश कार्तिकने धोनीला टाकले मागे, द. आफ्रिकेविरुद्ध खेळताना रचला इतिहास

मोईनचं अकाउंटच नाही

इंग्लंड क्रिकेट बोर्डानं याबाबत सविस्तर माहिती जाहीर केली आहे. मोईन अलीचं स्वतःचं सोशल मीडिया अकाउंटच नाही. त्याची प्रोफाईल क्रिकेट बोर्डाच्या वेबसाईटवर असून ती ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटशी लिंक आहे. त्याची बाकीची सोशल मीडिया अकाउंट्सही सक्रीय नसल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. त्यामुळे या ट्विट प्रकरणावरून सुरू असलेल्या गोंधळावर पडदा पडला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी