India vs New Zealand 1st T20I: आज पहिल्या T20 सामन्यात सर्वांच्या नजरा असतील या 5 खेळाडूंवर 

5 players to watch out for IND vs NZ 1st T20I:आज भारत आणि न्यूझीलंड पहिल्या T20 सामन्यात भिडतील. जाणून घ्या, कोणत्या 5 खेळाडूंवर लोकांच्या नजरा खिळल्या असतील.

five players to watch out for india vs new zealand 1st t20i from rohit sharma to daryl mitchell
पहिल्या T20 सामन्यात सर्वांच्या नजरा असतील या 5 खेळाडूंवर   |  फोटो सौजन्य: AP, File Image
थोडं पण कामाचं
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 मालिका
  • आज पहिला T20 सामना खेळवला जाणार आहे
  • दोन्ही संघ जयपूरच्या मैदानावर भिडतील

India vs New Zealand First T20I Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी संध्याकाळी तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दोन्ही संघ भिडतील. या स्टेडियममध्ये प्रथमच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. T20 विश्वचषक 2021 नंतर भारत आणि न्यूझीलंडचा संघ प्रथमच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत भारत साखळी फेरीतून बाद झाला आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. (five players to watch out for india vs new zealand 1st t20i from rohit sharma to daryl mitchell)

विराट कोहलीने T20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर, रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल तर टीम साऊदी न्यूझीलंडची धुरा सांभाळेल. न्यूझीलंडचा  नियमित कर्णधार केन विल्यमसनने कसोटी मालिकेची तयारी पाहता टी-20 मालिकेतून माघार घेतली आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्याने भारतीय क्रिकेटचे नवे पर्व सुरू होत असताना न्यूझीलंड संघाला अंतिम फेरीतील पराभव विसरून विजयाच्या मार्गावर परतायचे आहे. दोन्ही संघांकडे अनेक बलवान खेळाडू आहेत, जे स्वबळावर सामना फिरवू शकतात. आम्ही तुम्हाला अशाच 5 खेळाडूंबद्दल सांगत आहोत, ज्यांच्या कामगिरीवर आज सर्वांचे लक्ष लागून राहील.

रोहित शर्मा

'हिटमॅन' रोहित शर्माचा समावेश टी-20 क्रिकेटमधील बलाढ्य फलंदाजांमध्ये होतो. कोणत्याही गोलंदाजीचा मुकाबला करण्याची क्षमता त्याच्यात आहे. रोहितने 116 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.32 च्या सरासरीने आणि 139.61 च्या स्ट्राइक रेटने 3038 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 4 शतके आणि 24 अर्धशतके झळकावली आहेत. रोहितने मागील तीन टी-20 सामन्यांमध्ये टीकून फलंदाजी केली आहे. अशा परिस्थितीत भारतीय चाहत्यांना 'हिटमॅन'कडून आणखी एका चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.

केएल राहुल

सलामीवीर केएल राहुल हा देखील टी-२० चा सर्वोत्तम फलंदाज आहे. सलामीवीर म्हणून उतरण्याव्यतिरिक्त त्याने इतर ठिकाणीही फलंदाजी केली आहे. राहुल मैदानाच्या प्रत्येक भागात फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत 53 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 1751 धावा केल्या आहेत. त्याने 40.72 च्या सरासरीने आणि 143.29 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. राहुलने दोन शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत. राहुलने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत मोठी खेळी केली होती आणि आता त्याला पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करायचे आहे.

रविचंद्रन अश्विन

अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन दीर्घ काळानंतर मर्यादित षटकांची द्विपक्षीय मालिका खेळताना दिसणार आहे. त्याने अलीकडेच T20 विश्वचषक 2021 मध्ये प्रभावी गोलंदाजी केली, त्यानंतर अश्विनची न्यूझीलंड मालिकेसाठी देखील निवड झाली. अशा स्थितीत अश्विनकडून अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. त्याने 40 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 6.86 च्या इकॉनॉमी रेटने 58 बळी घेतले आहेत.  11 वर्षांपूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जयपूरमध्ये एकदिवसीय सामना झाला तेव्हा अश्विन त्या सामन्याचा भाग होता.

डॅरैल मिशेल

लोकांच्या नजरा न्यूझीलंडचा सलामीवीर डॅरैल मिशेलवरही असतील. 2021 च्या टी-20 विश्वचषकातील दोन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये फलंदाजी करून मिशेल लाइमलाइटमध्ये आला आहे.  जिथे त्याने भारताविरुद्धच्या सुपर-12 फेरीच्या सामन्यात 49 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने नाबाद ७२ धावांची खेळी केली होती. डेव्हॉन कॉनवेच्या दुखापतीनंतर किवीज मिचेलकडून अधिक भक्कम खेळण्याच्या आशा बाळगतील. मिशेलने 22 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 23.73 च्या सरासरीने आणि 139.06 च्या स्ट्राइक रेटने 356 धावा केल्या आहेत.

ईश सोधी

न्यूझीलंडचा भारतीय वंशाचा लेगस्पिनर ईश सोधी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने टी-20 विश्वचषकात दिग्गज फलंदाजांना बाद केले. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो संयुक्त सहाव्या स्थानावर आहे. त्याने या स्पर्धेत 9 विकेट घेतल्या. त्याने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी केली. सोढीकडून न्यूझीलंडला पुन्हा चमकदार गोलंदाजीची अपेक्षा असेल. सोधीने आतापर्यंत 64 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि 8.07 च्या इकॉनॉमी रेटने त्याच्या नावावर 82 आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी