भारताने आठव्यांदा सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकली, छेत्रीने मेसीशी केली बरोबरी

भारतीय फुटबॉल टीमने नेपाळचा ३-० असा पराभव केला आणि आठव्यांदा सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एक गोल करुन भारताचा कर्णधार सुनिल छेत्री याने लियोनेल मेसीच्या ८० आंतरराष्ट्रीय गोलच्या विक्रमाची बरोबरी केली.

Football India beat Nepal to lift eighth SAFF Championship title
भारताने आठव्यांदा सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकली, छेत्रीने मेसीशी केली बरोबरी 
थोडं पण कामाचं
  • भारताने आठव्यांदा सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकली, छेत्रीने मेसीशी केली बरोबरी
  • भारताने नेपाळचा पराभव केला
  • भारताचा कर्णधार सुनिल छेत्री याने लियोनेल मेसीच्या ८० आंतरराष्ट्रीय गोलच्या विक्रमाची बरोबरी केली

नवी दिल्ली: भारतीय फुटबॉल टीमने नेपाळचा ३-० असा पराभव केला आणि आठव्यांदा सॅफ (SAFF – South Asian Football Federation) फुटबॉल स्पर्धा जिंकली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एक गोल करुन भारताचा कर्णधार सुनिल छेत्री याने लियोनेल मेसीच्या ८० आंतरराष्ट्रीय गोलच्या विक्रमाची बरोबरी केली. भारतासाठी अंतिम सामन्याच्या उत्तरार्धात (दुसरे सत्र/Second Half) सुनिल छेत्री, सुरेश सिंह आणि सहल अब्दुल समद या तिघांनी प्रत्येकी एक गोल केला. छेत्रीने ४९, सुरेश सिंहने ५०व्या आणि सहल अब्दुल समदने ९०व्या मिनिटाला गोल केला. Football India beat Nepal to lift eighth SAFF Championship title

याआधी अंतिम सामन्याच्या पूर्वाधात (पहिले सत्र/First Half) फुटबॉलवर नियंत्रण मिळवले तरी गोल करणे भारताला जमले नव्हते. पण दुसऱ्या सत्रात भारताने छान खेळ करुन विजय मिळवला. 

भारताने आतापर्यंत १२ वेळा सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. यापैकी ८ वेळा स्पर्धा जिंकण्यात भारत यशस्वी झाला. यंदा (२०२१) आठव्यांदा सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकण्याची किमया भारताने केली. या विजयात मुख्य प्रशिक्षक (हेड कोच/चीफ कोच) इगोर स्टिमक यांच्या मार्गदर्शनाचाही मोठा वाटा होता. 

इगोर स्टिमक यांच्या मार्गदर्शनात भारत पहिल्यांदाच सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकला. याआधी २०१५ मध्ये स्टीफन कोंस्टेंटाइन आणि १९९३ मध्ये जिरि पेसेक यांच्या मार्गदर्शनात भारत सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकला. यामुळे इगोर स्टिमक हे सॅफ चॅम्पियन भारताचे तिसरे विदेशी प्रशिक्षक आहेत.

मनवीर सिंहचा प्रयत्न अयशस्वी

सुनिल छेत्रीने ४९व्या आणि सुरेश सिंहने ५०व्या मिनिटाला गोल केल्यानंतर भारताच्या मनवीर सिंहने ५२व्या मिनिटाला गोल करण्याचा प्रयत्न केला. पण नेपाळच्या गोलकीपरने फुटबॉल अडवला. यानंतर सहल अब्दुल समदने ९०व्या मिनिटाला गोल केला आणि भारताला ३-० असा मोठा विजय मिळवून दिला.

छेत्रीने मेसीशी केली बरोबरी

सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एक गोल करुन भारताचा कर्णधार सुनिल छेत्री याने लियोनेल मेसीच्या ८० आंतरराष्ट्रीय गोलच्या विक्रमाची बरोबरी केली. यामुळे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये छेत्री आणि मेसी संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर आहेत. पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो याने ११५ आंतरराष्ट्रीय गोलचा विश्वविक्रम केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी