नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज आणि २०११ चा विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य गौतम गंभीरने शुक्रवारी एक मोठा खुलासा केला. १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये पराभव झाल्यानंतर भारताला विश्व चषक जिंकून द्यायचा असं आपण स्वप्न पाहिलं होतं, असा खुलासा गंभीरने केला. माध्यमांशी बोलताना गंभीर म्हणाला की, वर्ल्ड कपविषयी त्याची पहिली आठवण ही ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेलेला १९९२ चा वर्ल्ड कप आहे. या वर्ल्डकपाच्या सामन्यांमध्ये भारताची कामगिरी खराब राहिली होती, यामुळे गौतम गंभीर भावूक झाला होता. तेव्हा त्याच्या भावांनी आणि मित्रांनी त्याची खूप थट्टा केली होती. तेव्हाच गंभीरने ठरवलं की, भारताला एकेदिवशी विश्वचषक जिंकून द्यायचा.
गंभीर म्हणाला की, 'माझा जन्म १९८१ मध्ये झाला होता आणि विश्व चषकाविषयीची माझी पहिली आठवण १९९२ ची आहे. रंगीत कपडे आणि पांढऱ्या चेंडूबरोबरचा तो पहिला वर्ल्ड कप होता. त्या स्पर्धेमध्ये भारताची कामगिरी खराब राहिल्याने भारत वर्ल्ड कपमधून बाहेर फेकला गेला. वर्ल्ड कपच्या स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे मी खूप रडलो. माझ्या मित्रांनी माझी खूप थट्टा केली, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तेव्हा मी ठरवलं की, एकेदिवशी मी भारताला विश्वचषक जिंकून देईल'. पुढे गंभीर म्हणाला की, कधी -कधी त्याला वाटायचं की त्याला देशासाठी वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही. परंतु २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये त्याची वर्णी लागली.
डावखुरा फलंदाज असलेल्या गंभीरने सांगितले की, '२०११ पर्यंत मी ५० षटकांचे वर्ल्ड कप सामने खेळले नव्हते आणि त्यामुळे मला वाटायचं की, माझं स्वप्न पूर्ण होणार नाही. परंतु तेव्हा देवाने माझं ऐकलं. मला आनंद आहे की, २ एप्रिल २०११ ला तो सुवर्ण दिवस उजाडला, जेव्हा भारताने विश्व चषक जिंकला'. या अंतिम सामन्यात गंभीरने सामना जिंकवणारी खेळी केली होती. या सामन्यात सचिन - सेहवाग लवकर बाद झाल्यानंतर गौतम गंभीरने एक बाजू संभाळत ९७ धावा केल्या. दरम्यान गंभीरला थिसारा परेराने बाद केलं, तेव्हा तो आपल्या शतकापासून फक्त ३ धावा दूर होता.
भारताने १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्त्वात आपला पहिला वर्ल्ड कप जिंकला होता आणि २०११ पर्यंत त्यांनी चषकाची वाट पाहिली. धोनीच्या नेतृत्त्वात भारताने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्धात फक्त एक सामना गमावला. भारताने उपांत्य फेरीत भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभव करत श्रीलंकेच्या विरुद्धात अंतिम सामना जिंकला. अंतिम सामना भारतीय संघाने ६ गडी राखून जिंकला होता आणि या सामन्यात धोनीने एक विजयी षटकार लगावला होता.