ICC चा मोठा निर्णय; नियमांत केले ३ मोठे बदल, पाहा DRS आणि अंपायर्स कॉल बाबत काय झाला निर्णय

ICC change DRS rules: गेल्या काही दिवसांत अंपायर्स कॉल आणि डीआरएसच्या नियमांवरुन वाद निर्माण झाला होता. या संदर्भात आयसीसीच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. 

ICC cricket committee continue umpire call rule changes in drs rules
ICC चा मोठा निर्णय, DRS संदर्भात नियमांत केले बदल  

नवी दिल्ली : इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) ICCची गुरुवारी एक बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांत अंपायर्स कॉल (umpire call rule)  आणि डीआरएसच्या नियमांवरुन (DRS rule) निर्माण झालेल्या वादावर या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीत असा निर्णय झाला आहे की, 'अंपायर्स कॉल' हा मैदानातील पंचांचा निर्णय कायम ठेवणं आवश्यक आहे. तर डीआरएसच्या नियमांत काही बदल करण्यात आले आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच झालेल्या वन-डे सीरिजमध्ये अंपायर्स कॉल, डीआरएस नियमांवरुन वाद निर्माण झाले होते. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने 'अंपायर्स कॉल' हा गोंधळात टाकणारा आहे असं म्हटलं होतं त्यासोबतच क्रिकेट जगतातील दिग्गजांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर आता डीआरएसच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत.

सध्याच्या नियमांनुसार, जर अंपायरने दिलेल्या नॉटआऊटच्या निर्णयाला आव्हान दिले तर तो बदलण्यासाठी बॉलचा ५० टक्क्यांहून अधिक भाग कमीत कमी एका स्टंपला हिट झाला पाहिजे. जर असं होत नसेल तर अशा स्थितीत बॅट्समन नॉट आऊट राहतो.

.... म्हणून अंपायर्स कॉलमध्ये बदल नाही 

बोर्डाची बैठक संपल्यावर बुधवारी आयसीसी बोर्डाने दिलेल्या निवेदनात आयसीसी क्रिकेट समितीचे प्रमुख अनिल कुंबळे म्हणाले, "अंपायर्स कॉल संदर्भात क्रिकेट समितीत मोठी चर्चा झाली आणि अंपायर्स कॉल्स कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला."

अनिल कुंबळे यांनी म्हटलं, मॅच दरम्यान होत असलेल्या चुका सुधारणं हा डीआरएसचा उद्देश आहे. मैदानात उपस्थित असलेल्या पंचांचा निर्णय आणि भूमिका ही महत्वाची आहे त्यामुळे त्यांचा निर्णय अबाधित ठेवत अंपायर्स कॉल कायम ठेवणं गरजेचं आहे.

DRS आणि थर्ड अंपायर संबंधित नियमात बदल

आयसीसीने डीआरएस आणि थर्ड अंपायर्स संबंधित नियमांत तीन बदल केले आहेत. आयसीसीने दिलेल्या निवेदनात म्हटलं, "डीआरएसमध्ये विकेट झोनची उंची वाढवून स्टंपच्या वर पर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." याचा अर्थ असा की, रिव्ह्यू घेतला जाईल तेव्हा बेल्सपर्यंतची उंची विचारात घेतली जाईल.

दुसरा बदल असा करण्यात आला आहे की, एलबीडब्ल्यूच्या निर्णयानंतर रिव्ह्यू घेण्यापूर्वी प्लेअर हा अंपायरसोबत चर्चा करु शकतो.

तर तिसरा बदल असा करण्यात आला आहे की, थर्ड अंपायर शॉर्ट रनच्या स्थितीत रिप्ले पाहून निर्णय घेऊ शकणार आहे. जर चूक झाली असेल तर पुढील बॉल टाकण्यापूर्वी त्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी