ICC Cricket World Cup 2019: भारताची पहिली मॅच उशिरा होण्यामागे हे आहे कारण

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 05, 2019 | 17:07 IST | टाइम्स नाऊ हिंदी

ICC Cricket World Cup 2019: वर्ल्ड कपच्या पहिल्या वेळापत्रकानुसार भारताची पहिली मॅच २ जूनला होणार होती. पण, त्यानंतर वेळापत्रका बदल झाला. बीसीसीआयनेच आयसीसीपुढे भारताची मॅच उशिरा ठेवण्याची विनंती केली होती.

team india world cup
टीम इंडिया वर्ल्डकप 

लंडन : वर्ल्ड कपमध्ये आज, भारताची पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे. आफ्रिकेच्या दोन मॅच झाल्यानंतर ते तिसरी मॅच खेळत आहे. वर्ल्ड कपमधील सगळ्या टीमने किमान एक मॅच खेळली असताना भारताचीच पहिली मॅच सगळ्यांत उशिरा होत आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट फॅन्समध्ये या विषयी प्रश्न चिन्ह उपस्थित राहिले आहे. भारताचीच पहिली मॅच सगळ्यात उशिरा कशी काय सुरू झाली? या विषयी शंका उपस्थित केली जात आहे. पण, टीम इंडियाचा प्रत्यक्ष वर्ल्ड कप कार्यक्रम उशिरा सुरू होण्यामागे लोढा समितीच्या शिफारसी आणि बीसीसीआयच्या काही मागण्या असल्याचं सांगण्यात आलंय. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार भारताची पहिली मॅच २ जूनला होणार होती. पण, त्यानंतर वेळापत्रकात बदल झाला आणि भारताची पहिली मॅच ५ जूनला निश्चित झाली. बीसीसीआयनेच आयसीसीपुढे भारताची पहिली मॅच उशिरा घेण्याविषयी आग्रह धरला होता. त्यानंतरचा कार्यक्रमात बदल करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

काय आहे लोढा समितीची शिफारस?

सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार आयपीएल संपल्यानंतर १५ दिवस आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आराम देणे बंधनकारक आहे. टीम इंडियाच्या कार्यक्रमात बदल करण्यामागे हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. आयपीएलची शेवटची मॅच १९ मे रोजी होणार होती. त्यानंतर १५ दिवसांच्या आत २ जूनला भारतीय खेळाडू पहिली मॅच खेळणं अशक्य होतं. त्यामुळचं भारताची पहिली मॅच पुढं ढकलण्यात आली. पण, भारतात लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर आयपीएलच्या वेळापत्रकात बदल झाला आणि फायनल मॅच १२ मे रोजी खेळवण्यात आली. दुसरीकडे वर्ल्ड कपमधील वेळापत्रक निश्चित झाले होते आणि भारताची पहिली मॅच ५ जून रोजी ठरली होती. अर्थात भारताची टीम २३ मे रोजी इंग्लंडला रवाना झाली आणि खेळाडूंना इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यास वेळ मिळाला.

विराट कोहली काय म्हणतो?

भारताला वर्ल्ड कपमध्ये पहिली मॅच खेळण्यास उशीर झाला असला तरी कॅप्टन विराट कोहलीने त्याचे स्वागत केले आहे. या संदर्भात कोहली म्हणाला, ‘आमच्यासाठी वर्ल्ड कप कार्यक्रम उशिरा सुरू होणे चांगलेच ठरले आहे. आम्हाला इंग्लंडमधील परिस्थिती समजून घेण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्याचबरोबर आम्ही इतर टीममध्ये असणारे कच्चे दुवे जाणून घेतले. त्यामुळे आमच्या वर्ल्ड कप कार्यक्रमात झालेला बदल स्वागतार्हच आहे. त्यात चुकीचे काही नाही.’

काय आहे लोढा समिती?

भारतात आयपीएलमध्ये २०१३च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टाने लोढा समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून क्रिकेटची विश्वासार्हता राखण्यासाठी शिफारसी केल्या जात आहेत. लोढा समितीने भारतात क्रिकेटमध्ये सुधारणा आणल्या आहेत आणि खेळाडूंच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. क्रिकेटमधील फिक्सिंग नाहीसे करण्यात लोढा समितीचे मोठे योगदान आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी