World Cup 2019: ऑस्ट्रेलियाचा पाकवर विजय, पाहा पॉईंट्स टेबलमध्ये काय झाला बदल! 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 21, 2019 | 23:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

World Cup 2019 Points Table: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत पॉईंट्स टेबलमध्ये थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर पाकिस्तान अद्यापही तळालाच आहे.

aus_warner-AP
ऑस्ट्रेलियाचा पाकवर विजय, पॉईंट्स टेबलमध्ये काय झाला बदल!  |  फोटो सौजन्य: AP

लंडन: क्रिकेट विश्वचषक २०१९ मधील १७ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ४१ धावांनी विजय मिळवला आहे.  या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने पॉईंट्स टेबलमध्ये थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर न्यूझीलंड अद्यापही पहिल्या स्थानीच विराजमान आहे. कारण न्यूझीलंडने आतापर्यंत तीनही सामन्यात विजय मिळवला असून त्यांच्या खात्यात ६ गुण जमा आहेत. पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने देखील आता सहा गुण कमावले आहेत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चार सामने खेळले असून तीन मध्ये विजय मिळवला आहे तर. भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे ४ सामन्यात त्यांनी ६ गुणांची कमाई केली आहे. तर यामुळे इंग्लंड मात्र तिसऱ्या स्थानी गेलं आहे. कारण की, त्यांनी ३ सामन्यात ४ गुणांची कमाई केली आहे. दोन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. 

दुसरीकडे पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जोरदार टक्कर दिली. पण त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान अद्यापही आठव्या स्थानीच आहे. त्यांनी आतापर्यंत ४ सामने खेळले असून फक्त एकातच विजय मिळवला आहे. दोन सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर एका सामन्यात पावसाने खो घातल्याने त्यांना त्या सामन्यात फक्त एकच गुण मिळाला. त्यामुळे सध्या त्यांच्या खात्यात तीनच गुण जमा आहेत.  दुसरीकडे बांगलेदशला देखील चार सामन्यात तीनच गुण मिळवता आले आहेत. कारण की, त्यांनीही एका सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव स्वीकारला. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे त्यांनाही तीन गुण मिळाले आहेत. पण रनरेटच्या आधारे ते पाकिस्तानच्या पुढे आहेत. 

तर सध्या पॉईंट्स टेबलमध्ये भारत चौथ्या स्थानी आहे. कारण की, भारताने आतापर्यंत दोनच सामने खेळले आहेत. पण या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात ४ गुण जमा आहेत. दरम्यान, उद्या भारताची लढत न्यूझीलंडसोबत असणार आहे. तर १६ जून रोजी भारत पाकिस्तानशी भिडणार आहे. या दोन्ही सामन्यात भारत विजय मिळवून अव्वल स्थानी जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी