मोठा खुलासा: एबी डिव्हिलियर्स वर्ल्ड कप संघात परत येणार होता,पण...

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 06, 2019 | 14:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

icc cricket world cup 2019: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एबी डिव्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेच्या टीममधून खेळणे शक्य होते. निवृत्तीचा पुर्नविचार करत डिव्हिलियर्सने टीम मॅनेजमेंटला तशी ऑफरही दिली होती.

 AB de Villiers
तर एबी डिव्हिलियर्स आफ्रिकेच्या टीममध्ये असता!  |  फोटो सौजन्य: PTI

लंडन : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग तीन पराभव पत्करल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड कपमधील पुढचा प्रवास अडचणीत आला आहे. महत्त्वाचे खेळाडू जखमी, टीममध्ये असलेल्या खेळाडूंचा हरवलेला फॉर्म आणि पहिल्या पराभवानंतरच खचलेलं मनोबल या परिस्थितून हा संघ बाहेर पडण्याची शक्यता कमी दिसत आहे. बांग्लादेशसारख्या तुलनेत कमी क्षमता असलेल्या टीमकडून आफ्रिकेला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. आजवर वर्ल्ड कपमध्ये सलग तीन मॅच पराभूत होण्याची आफ्रिकेची ही पहिलीच वेळ आहे. या बिकट परिस्थितीमध्ये टीमला त्यांचा महान बॅट्समन एबी डिव्हिलियर्सची आठवण होत असावी. पण, वर्ल्ड कपच्या टीम सिलेक्शनवेळीच डिव्हिलियर्सची दखल न घेतलेल्या टीम मॅनेजमेंटला आता त्याचा पश्चाताप होत असावा. क्रिकेटप्रेमींना आश्चर्य वाटेल. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या डिव्हिलियर्सला आफ्रिकेच्या टीममधून खेळणे शक्य होते. डिव्हिलियर्सने टीम मॅनेजमेंटला तशी ऑफरही दिली होती. पण, टीम सिलेक्शनपूर्वी त्याची दखलच घेण्यात आली नाही.

डिव्हिलियर्सचा प्रस्ताव आणि नकाराचे कारण

वर्ल्ड कप किंवा आयसीसीच्या कोणत्याही मोठ्या स्पर्धांमध्ये आफ्रिकेची टीम आजवर नॉक आऊट राऊंडमध्ये अडखळायची. या टीमला कधी वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत मजल मारता आली नाही. ग्रुप मॅचेसमध्ये ही टीम दमदार कामगिरी करायची. पण, यंदाचा वर्ल्ड कप या टीमच्या दमदार कामगिरीला अपवाद ठरत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच सलग तीन मॅच पराभूत होण्याची ही आफ्रिकेची पहिली वेळ आहे. त्यामुळं आता टीम सिलेक्शन आणि मॅनेजमेंटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलंय. मे महिन्यात आफ्रिकेच्या टीम सिलेक्शनवर अंतिम निर्णय घेतला जात असताना. आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने आपल्या निवृत्तीवर फेरविचार करून वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानं कॅप्टन फाफ डुप्लेसिस, कोच ओट्टिस गिब्सन आणि टीमच्या निवड समितीचे अध्यक्ष लिंडा झोंडी यांच्याशी संपर्क साधला होता. पण, त्याला हे शक्य नसल्याचे सांगण्यात आले होते. भारतातील एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या एका मुलखतीतही त्यानं वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा होती, असं स्पष्ट सांगितलं होतं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या या विनंतीची दखलही घेण्यात आली नाही. एबी डिव्हिलियर्सने मे २०१८ मध्ये म्हणजेच वर्ल्ड कपच्या बरोबर एक वर्ष आधी निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टीममध्ये समावेश होण्यासाठी तो कोणत्याही पातळीवर पात्र ठरत नव्हता. तसेच डिव्हिलियर्सला परत बोलवणे हे त्याच्या अनुपस्थितीत देशासाठी खेळत असलेल्या खेळाडूंवर अन्याय केल्यासारखे झाले असते. असे सूत्रांचे म्हणणे आहे.

डिव्हिलियर्स असता तर...

डिव्हिलियर्स हा आफ्रिकेच्या आजवरच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्यानं १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय वन-डेमध्ये ५३च्या सरासरीने ९ हजार ५७७ रन्स केल्या आहेत. गेल्या वर्षी त्याने ट्विटकरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. फेब्रुवारी २०१९मध्ये तो ३५ वर्षांचा झाला पण, आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना त्यानं ४४च्या सरासरीनं ४४२ रन्स केल्या. काल बुधवारी ५ जून रोजी झालेल्या मॅचमध्ये भारतानं आफ्रिकेचा सहा विकेट्सनी पराभव केला. सलग तीन पराभवांमुळे आफ्रिकेच्या टीमपुढील आव्हाने वाढली आहेत. जर, टीममध्ये डिव्हिलियर्स असता तर कदाचित या टीमच्या मॅचचे निकाल वेगळे असते, असे जाणकारांचे मत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मोठा खुलासा: एबी डिव्हिलियर्स वर्ल्ड कप संघात परत येणार होता,पण... Description: icc cricket world cup 2019: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एबी डिव्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेच्या टीममधून खेळणे शक्य होते. निवृत्तीचा पुर्नविचार करत डिव्हिलियर्सने टीम मॅनेजमेंटला तशी ऑफरही दिली होती.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola