आयसीसी कसोटी क्रमवारी: विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची घसरण, पंतने घेतली मोठी झेप

ICC test Rankings: आयसीसी टेस्ट रँकिंगची घोषणा झाली असून यावेळी कर्णधार विराट कोहलीची काहीशी घसरण झाली आहे. याशिवाय रहाणेच्या क्रमवारीत देखील घसरण पाहायला मिळाली आहे.

 Kohli_Rahane
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची घसरण  |  फोटो सौजन्य: AP, File Image

थोडं पण कामाचं

  • आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत विराट कोहलीची घसरण 
  • फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत केन विल्यमसन आणि पॅट कमिन्स हे अव्वल स्थानी
  • रिषभ पंतने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत 19 स्थानांची घेतली झेप

दुबईः आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली तिसर्‍या स्थानावर घसरला असूनो ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. दुसरीकडे मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने मात्र चांगली कामगिरी करत आठवं स्थान पटकावलं आहे. याआधी तो १०व्या स्थानी होता. ताज्या क्रमवारीनुसार कोहलीचे ८७० गुण आहेत. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर विराट मायदेशी परतला आहे. सोमवारी त्यांची पत्नी अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 
 
कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी असणारा स्मिथ हा ९०० गुणांसह दुसर्‍या स्थानी आहे तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ९१९ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. सिडनी कसोटी सामन्यात स्मिथने १३१ आणि ८१ धावा केल्या होत्या. तर विल्यमसनने पाकिस्तानविरुद्धच्या क्राइस्टचर्च कसोटी सामन्यात २३८ धावा केल्या होत्या. आयसीसी क्रमवारीत सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा तो पहिला किवी क्रिकेटपटूही ठरला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात दोन अर्धशतके झळकावून सामना ड्रॉ करण्यात मोलाची भूमिका बजावणारा पुजारा हा आठव्या स्थानावर आहे तर कर्णधार अजिंक्य रहाणेची मात्र पहिल्यांदाच घसरण झाली असून तो आता सातव्या स्थानी पोहचला आहे. दुसरीकडे रिषभ पंतने ३६ आणि ९७ धावांची खेळी करत थेट २६व्या स्थानी झेप घेतली आहे. जवळजवळ १९ जणांना मागे टाकून पंत २६व्या स्थानी पोहचला आहे. याशिवाय हनुमा विहारी ५२व्या, शुबमन गिल ६९व्या आणि आर अश्विन ८९व्या स्थानी आहेत.

दुसरीकडे गोलंदाजांमध्ये ऑफस्पिनर अश्विनच्या रँकिंगमध्ये दोन स्थानांनी घसरण झाली आहे. तो सध्या नवव्या स्थानी आहे तर जसप्रीत बुमरा हा आता दहाव्या स्थानी गेला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्स हा पहिल्या स्थानी आहे. तर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड हा दुसऱ्या स्थानी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी