Icc world cup 2019: तीन टीमचे सेमीफायनलसाठी ‘जर, तर’चे गणित पाहा

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 25, 2019 | 19:31 IST | रविराज गायकवाड

Icc world cup 2019: सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाला पुढची किमान एक मॅच तरी जिंकावी लागणार आहे. तर भारतालाही पुढच्या चार पैकी जास्तीत जास्त मॅच जिंकाव्या लागणार आहेत.

ICC Cricket World Cup Trophy
क्रिकेट वर्ल्ड कप रंगतदार वळणार   |  फोटो सौजन्य: AP

लंडन : वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा आता महत्त्वाच्या वळणावर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यातील काही धक्कादायक निकालांनंतर आता सेमीफायनलसाठी अनेक टीमना दरवाजे खुले झाले आहेत. कोणतीही टीम आपला सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित असल्याचं सांगू शकत नाही. सध्या गुण तक्त्यात पहिल्या चार क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड या चारही टीमना गाफील राहून चालणार आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया थोडे निश्चिंत असले तरी, त्यांना पुढची किमान एक मॅच तरी जिंकावी लागणार आहे. तर भारताच्या अजून चार मॅच शिल्लक आहेत. त्यापैकी जास्तीत जास्त मॅच खिशात टाकाव्या लागणार आहेत. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवामुळं इंग्लंडसाठी गणित थोडं अवघड झालं आहे. पण, इंग्लंडची टीम हे आव्हान पार करेल अशी शक्यता वाटत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आज होत असलेल्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया आणि उद्या होत असलेल्या पाकिस्तान-न्यूझीलंड या मॅचच्या निकालावर बरच काही अवलंबून असणार आहे.

कोणाला कशी संधी?

सध्या श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान यांना देखील सेमीफायनलपर्यंत पोहोचण्याची थोडी का असेलना संधी आहे. त्यासाठी त्यांना जर तरच्या समीकरणांवर अवलंबून रहावं लागणार आहे. पहिल्या चार क्रमांकावर सध्या अनुक्रमे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड अशा टीम आहेत. पण, या चार टीममध्ये एकमेकांच्या विरोधात काही मॅच शिल्लक आहेत. त्यात न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया (२९ जून), भारत-इंग्लंड (३० जून) आणि इंग्लंड-न्यूझीलंड (३ जुलै) या तीन मॅच महत्त्वाच्या आहेत. यामुळे काही टीम्सचे पॉइंट्स कमी होणार आहेत. याचा फायदा श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तानला होऊ शकतो. अर्थात या टीमना आपल्या परफॉर्मन्स बरोबर प्रतिस्पर्धी टीम्स पराभूत होतील, याकडं पहावं लागणार आहे.

पाकिस्तान अजूनही आशावादी

सध्या दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज या टीम तळात आहेत. त्यांना पुढे जाण्याची संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. पण, वेस्ट इंडिजनं १ जुलै रोजी होणाऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेला पराभूत केलं तर, बांग्लादेश आणि पाकिस्तानला फायदा मिळू शकतो. हा फायदा उठवण्यासाठी पाकिस्तानला उद्या (२६ जून) बलाढ्य न्यूझीलंडला पराभूत करावं लागणार आहे. उद्याच्या मॅचवर पाकिस्तानचं स्पर्धेतील भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यानंतर त्यांना अफगाणिस्तान (२९ जून) आणि बांग्लादेश (५ जुलै) यांना पराभूत करावं लागणार आहे. पाकिस्तान न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाला तर, त्यांना गाशा गुंडळावा लागणार आहे.

बांग्लादेशला धूरस संधी

बांग्लादेशच्या आता केवळ दोन मॅच शिल्लक राहिल्यात आहेत. एक मॅच २ जुलैला भारताविरुद्ध तर दुसरी ५ जुलैला पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. बांग्लादेशची टीम कोणत्याही बलाढ्य टीमला पराभूत करण्याची क्षमता असलेली टीम आहे. पण, पुढच्या दोन्ही मॅच त्यांच्यासाठी जडण्याची शक्यता आहे. जर त्यांनी भारत आणि पाकिस्तानला पराभूत करण्याची किमया केली तर, त्यांचे ११ पॉइंट्स होतील. पण, त्याचवेळी इंग्लंडची टीम ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड विरुद्ध पराभूत होईल, यासाठी त्यांना प्रार्थना करावी लागणार आहे. त्याचबरोबर श्रीलंकेलाही इथून पुढच्या कोणत्याही मॅचमध्ये विजय मिळणार नाही, यासाठी देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत.

श्रीलंकेचं गणित काय?

श्रीलंकेला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पुढच्या तिन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. सध्या त्यांचे सहा पॉइंट्स आहेत. पुढच्या तीन मॅच जिंकले तर, ते १२ पॉइंट्स मिळवून पहिल्या चारमध्ये पोहचू शकतात. त्यांची पुढच्या मॅच दक्षिण आफ्रिका (२८ जून), वेस्ट इंडिज (१ जुलै) आणि भारत (६ जुलै) यांच्या विरुद्ध आहेत. यात दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या वर्ल्ड कपमध्ये फारशी चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यांच्या विरुद्ध श्रीलंका विजय मिळवण्याचा प्रयत्न करू शकले. पण, भारताविरुद्ध त्यांना विजय मिळवणं सोपं नाही. त्यातच भारताविरुद्धची मॅच रॉऊंड रॉबिन पद्धतीत शेवटून दुसरी आहे. त्यामुळं जर, श्रीलंकेनं आफ्रिका आणि विंडिजला पराभूत केलं तर, ते शेवटपर्यंत सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करू शकतात. त्यातही त्यांना इंग्लंड पुढच्या तिन्ही मॅच पराभूत होईलच, अशी प्रार्थना करावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Icc world cup 2019: तीन टीमचे सेमीफायनलसाठी ‘जर, तर’चे गणित पाहा Description: Icc world cup 2019: सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाला पुढची किमान एक मॅच तरी जिंकावी लागणार आहे. तर भारतालाही पुढच्या चार पैकी जास्तीत जास्त मॅच जिंकाव्या लागणार आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola